जालना – जनावर चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला मुद्देमालासह पकडले

जालना शहरात जनावरे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. याचा छडा लावून जालना पोलिसांनी संभाजीनगरचा जनावरे चोरणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून तीन लाख 60 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ज्प्त केला आहे. ही कारवाई आज शनिवारी करण्यात आली.

जिल्ह्यात व शहरात जनावर चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी जनावर चोरी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व उघडकीस आणणे बाबात स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना देवून आदेशीत केले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थापन केले होते.

आज 6 मार्च रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना माहिती मिळाली की, नवीन मोंढा परिसरातून काही इसम स्कॉर्पिओ गाडीमध्ये जनावरांची चोरी करुन पळाले आहेत. तसेच सदरची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जालना-संभाजीनगर रोडने गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संभाजीनगर शहरात अमरप्रित हॉटेल-कारर्डा कॉर्नर, उस्मानपुरा स्मशानभुमी रोड या मार्गावर जागृत हनुमान मंदिर प्रतापनगर येथे सापळा रचून स्कॉर्पिओ कार थांबविली. पोलिसांना पाहताच गाडीमधील इसम वाहन सोडून पळून जाऊ लागला. मात्र पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.

animal-theft

चौकशी केल्यावर त्याने आपले नाव शेख समीर शेख शाकीर उर्फ कुरेशी (श्ररा. सम्सनगर शाहनुरवाडी संभाजीनगर) सांगितले. तसेच साथीदारांसह स्कॉर्पिओ गाडीत जनावर चोरी करीत असल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडी क्र. (एमएच-06 एझेड 8161) ची पाहणी करता गाडीच्या काचेवर काळ्या रंगाची फिल्म लावलेली व मागच्या बाजुचे बसण्याचे सिट काढून ठेवलेले किंमती 3 लाख रुपये ज्यात दोन काळ्या पांढऱ्या गाई व एक काळ्या पांढऱ्या रंगाचे वासरु किंमत 60 हजार रुपये असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी योगेश भगत (रा. जालना) यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, पोहेकॉ भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी,देविदास भोजने, किशोर पुंगळे यांनी केलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या