JAMKHED: चेकवर खाडाखोड करून एक लाख रूपयांची रक्कम खात्यातून परस्पर गायब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

स्वामी विवेकानंद बचत गटाने दिलेल्या चेकवर खाडाखोड करून एक लाख रूपयांची रक्कम खात्यातून परस्पर काढून अपहार केला. या प्रकरणी संबंधित बँक अधिकारी व खातेदारांनी संगनमत करून हा अपहार केला आसल्याचा आरोप बचत गटाचे अध्यक्ष विकास पवळ यांनी केला आहे.

जामखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी विवेकानंद स्वयंसहायता बचत गट आहे. या बचत गटाच्या खात्यातून अजिनाथ जगन्नाथ जायभाय यांना चेक नं १६०४३७ या नंबरचा २८ हजार ५९२ रुपयांच्या रकमेचा चेक दि १०/१२/२०१८ रोजी देण्यात आला होता. अडीच महीन्यानंतर दि ८/३/२०१९ रोजी जामखेड शाखेच्या स्टेट बँकेच्या खात्यातून हा चेक पास झाला. मात्र २८ हजार ५९२ रुपयांऐवजी खात्यातून १ लाख२८ हजार ५९२ या रकमेचा चेक पास झाला.

आपल्या बचत गटाच्या खात्यातून एक लाख रूपयांची जादा रक्कम चेक द्वारे पास झाली आसल्याची बचत गटाच्या लोकांना माहीती मिळताच ते बँकेत धावले. बँकेचे शाखा व्यवस्थापक विनयकुमार निनावे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी या घटनेवर सावरासावरीचे उत्तर दिले. या नंतर पास झालेला चेक पहीला आसता त्या चेकवर अजिनाथ जायभाय यांनी २८ हजार ५९२ या रकमेच्या आधी एक आकडा वाढवला व सदरची रक्कम १ लाख २८ हजार ५९२ रुपये केले व तो चेक संबंधित अधिकार्‍यांकडे दिला. त्यांनी कसलाही विचार न करता अजिनाथ जायभाय यांच्या खात्यात १ लाख २८ हजार ५९२ रुपये वर्ग केले.

याबाबत स्वामी विवेकानंद बचत गटाने अध्यक्ष विकास पवळ, उपाध्यक्ष संतोष सरसमकर, सचिव प्रदिप जगदाळे, आशोक शिंदे, अशोक वीर, जयसिंग उगले, आरुण उगले, किरण सोनवणे, डॉ दिनेश रसाळ, स्वप्निल सोनार, मनोज बन, गौतम नेटके, यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक विनयकुमार निनावे यांना निवेदन दिले आहे. तसेच बँकेकडून आमची फसवणूक झाली आहे व संबधित रक्कम पुन्हा आमच्या खात्यात जमा करावी व अपहारा बाबत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

बँक अधिकार्‍यावर कारवाई होणार का?
अजिनाथ जायभाय यांनी आपल्या खात्यात चेक वटण्यासाठी बँकेत आणला होता. त्या वेळी बचत गटाने फक्त २८ हजार ५९२ रु चेक दिला. जायभाय यांनी नंतर चेकवर एकचा आकडा वाढवला होता मात्र त्या पुढे अक्षरी लाख लिहीलेले दिसत नव्हते. तरीही संबंधित बँक अधिकाऱ्यांनी चेक व्यवस्थित न पहाता चेक पास केलाच कसा? त्यामुळे बँक व्यवस्थापक संबंधित बँक अधिकारी व खातेदार जायभाय यांच्यावर कारवाई करणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जामखेड शाखेत नेहमीच मोठी वर्दळ असते. ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. साध्या साध्या गोष्टीसाठी अनेक चकरा माराव्या लागतात. कर्मचारी नीट समजावून देत नाहीत. मराठी भाषक कमी कर्मचारी आहेत. सामान्य माणसांना हिंदी नीट समजत नाही. खुपच नियमानुसार आम्ही काम करतो असे सांगतात. मग चेकमध्ये खाडाखोड करून चेक कसा वटला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.