नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जामखेड

सततचा दुष्काळ, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील शिऊर येथील शेतकरी पंढरीनाथ बलभीम बागल ( 60) यांनी आपल्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पंढरीनाथ बागल यांच्याकडे सहकारी बँकेचे एप्रिल 2016 मध्ये घेतलेले 37700 रूपये कर्ज आहे. याचे व्याज 14 हजाराच्या आसपास होत आहे. तसेच खाजगी सावकाराचेही काही कर्ज होते असे बोलले जात आहे. त्याच बरोबर सततचा दुष्काळ, शेतातील नापिकी व शेतमालाचे पडलेले भाव यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते तणावग्रस्त होते. शेवटी 24 जानेवारी रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

बागल यांच्या नावावर दोन एकर शेती आहे. यातील एक एकर कांदा लागवड केलेली होती कांदा पिकाला बाजारात भाव नसल्याने खर्चही निघाला नाही. यामुळे ते अधिकच वैफल्यग्रस्त होते. तसेच एका एकर क्षेत्रात ज्वारी आहे. पिक चांगले आले परंतु रानडुक्करांच्या उपद्रवाने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. गतवर्षी रानडुक्करांनी नुकसान केलेल्या पिकांचा पंचनामा करून वनविभाकडे प्रस्ताव दाखल केला होता. यासाठी खर्च हजार रुपये आला व एक वर्षांनी बाराशे रुपये नुकसानभरपाई मिळाली. यावर्षीही मोठ्या प्रमाणावर रानडुक्करांनी नुकसान केलेले आहे. यामुळे ते अनेक दिवसांपासून नैराश्यग्रस्त होते. यातूनच त्यांनी अपली जीवनयात्रा संपवली असल्याचे बोलले जात आहे.