
जामखेड नगरपरिषदेची मुदत 31 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व आरक्षण मान्यता देण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत ही प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खऱया अर्थाने निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.
जामखेड नगरपरिषदेची मागील पंचवार्षिक निवडणूक 6 जानेवारी 2016 रोजी झाली होती व मतमोजणी 11 जानेवारी रोजी झाली, तर नवीन नगराध्यक्षांची निवड 8 फेब्रुवारी 2016 रोजी झाली होती. त्यामुळे नगरपरिषदेची मुदत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संपत आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. 24 डिसेंबर रोजी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे व अंतिम प्रभाग रचना 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत.
नगर परिषदेच्या 21 पैकी 11 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 3, तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 6 जागा आरक्षित असणार आहेत. अनुसूचित जातीच्या 3 जागांपैकी 2, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या 6 जागांपैकी 3, तर उर्वरित 12 जागांपैकी 6 जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत.
प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम
11 नोव्हेंबर – प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करणे. 20 नोव्हेंबर – प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे. 24 नोव्हेंबर – आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिद्ध करणे. 27 नोव्हेंबर – आरक्षणाची सोडत काढणे. 2 डिसेंबर- प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे, आरक्षण, प्रसिद्ध करणे. 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर – हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी. 15 डिसेंबर- हरकती, सूचना यावर सुनावणी. 18 डिसेंबर- हरकती, सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय आयुक्तांना पाठवणे. 24 डिसेंबर- अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे. 30 डिसेंबर – अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणे.

































































