न्यायालय, सैन्य, यंत्रणा हे काहीच शिल्लक राहणार नाही… सत्यपाल मलिक यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर येत्या निवडणुकीत जनतेने यांच्याविरुद्ध मतदान केलं नाही, तर ते तुम्हाला मतदान करायच्या योग्यतेचे ठेवणार नाहीत. ते म्हणतील की जर आम्हीच निवडणुका जिंकतोय तर निवडणुका घेण्याची गरज काय? मग यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतंही न्यायालय, सैन्य किंवा यंत्रणा शिल्लक राहणार नाही, असा गंभीर इशाराही मलिक यांनी दिला आहे.

सध्या मलिक हे राजस्थान दौऱ्यावर असून ते रविवारी अल्वर जिल्ह्यातील बान्सूर येथे गेले होते. तिथे त्यांनी रामदरबार मंदिरात मूर्तीच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हे लोक मला गद्दार ठरवू इच्छित आहेत. पण, मी माझं काम इमानदारीने पार पाडलं आहे. जम्मू-कश्मीरमध्ये मला 300 कोटींची ऑफर देण्यात आली होती. ती मी धुडकावली. आता मला अडकवू शकत नाहीत, त्यामुळे माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्यांविरोधात ईडी, सीबीआयची कारवाई सुरू झाली आहे. त्याचा हेतू फक्त माझ्याविरुद्ध कारस्थान रचून मला अटक करण्याचा आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अदानी यांचा साथीदार आहे. ज्याने तीन वर्षांत इतकं धन कमावलं की देशातला सगळ्या इमानदार आणि प्रमाणिक नागरिक बनला. संसदेत जेव्हा राहुल गांधी यांनी 20 हजार कोटी रुपयांविषयी विचारलं तेव्हा पंतप्रधान त्याचा हिशोब देऊ शकले नाहीत. पंतप्रधान आपल्या हाताखाली भ्रष्टाचार होऊ देतात. पण, तुम्ही यंदा यांच्या सत्तेचे फासे उलटवू शकता. पुलवामा येथे आपले 40 जवान शहीद झाले होते. जेव्हा सीआरपीएफ जवान एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असत, तेव्हा आम्हाला याची माहिती न देता गृहमंत्रालयाला याची माहिती दिली जात होती. पुलवामा हल्ल्याचा तपास झाला नाही. जर झाला असता तर गृहमंत्र्यांना अटक झाली असती आणि त्यांचे अनेक अधिकारीही कारागृहात असते, अशी घणाघाती टीका मलिक यांनी केली.