कश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कश्मीर खोऱ्यातील शोपियां जिल्ह्यात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आलं आहे. या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं असून, दोन जण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती मिळत आहे.

शोपियां जिल्ह्यातील नंदीगाम भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली. यानंतर सुरक्षादलांनी या भागाला घेरून शोधमोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षादलाने केलेल्या गोळीबारात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या चकमकीत सेनेचा एक जवान शहीद झाला असून, दोन जवान जखमी झाले. या भागात अद्यापही चकमक सुरू असून, शोधमोहीमही हाती घेण्यात आली आहे.

पुंछ सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून उखळी तोफांचा हल्ला
कश्मीर खोऱ्यात चकमकी सुरु असतानाच पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ( एलओसी) पाकिस्तानी सैन्याकडून मंगळवारी सकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.पाकिस्तानी सैनिकांकडून हिंदुस्थानी पथकांवर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. या हल्ल्याला हिंदुस्थानी सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.