
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादाच्या खात्म्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी कंबर कसली आहे. लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने परिसरात शोधमोहिम राबवण्यात येत आहे.
कुपवाडा जिल्ह्यातील डोबनार मचल भागात लष्कर आणि पोलिसांनी सुंयक्त शोध मोहिम हाती घेतली आहे. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी लष्कराचे जवान आणि पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाई लष्कर आणि सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहिम सुरू आहे. पोलिसांनी या भागाची नाकाबंदी केली आहे.




























































