बाळाचा बाप खोटारडा निघाला; महिलेने बाळाचा त्याग केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमधील एका जोडप्याने अपत्यप्राप्तीसाठी स्पर्म डोनरची निवड करून अपत्यप्राप्ती करण्याचा निर्णय घेतला. स्पर्म डोनरने स्वतःची ओळख लपवत फसवणूक केल्याचे काही काळाने दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्या महिलेने त्या स्पर्म डोनरपासून झालेल्या अपत्याचा त्याग केला असून त्याला टोकियोच्या चाइल्ड केअर क्लिनिककडे सूपूर्द करण्यात आले आहे. तेथून त्याला दत्तक देण्यात येणार आहे.

एका 30 वर्षांच्या जपानी महिलेने अपत्यप्राप्तीसाठी स्पर्म डोनरचा शोध घेतला. सोशल मिडीयावर त्यांना अपेक्षित असलेला डोनर मिळाला. त्यानंतर गर्भधारणेसाठी महिलेने त्याच्याशी संबंध ठेवले. गर्भधारणा झाल्यानंतर महिलेला आणि तिच्या पतीला स्पर्म डोनरने फसवणूक केल्याचे समजले. त्याने त्याची ओळख लपवून महिलेशी संबंध ठेवले. डोनरची खरी माहिती समजताच त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गर्भपाताचा कालावधी निघून गेला होता. त्यामुळे त्या डोनरच्या संबंधातून जन्म झालेल्या अपत्याचा जपानी महिलेने त्याग केला आहे.

जपानी नागरिकत्व असलेला आणि पदवीधर आणि अविवाहित स्पर्म डोनरचा आम्ही शोध घेत होतो. या व्यक्तीने आपण जपानी असून क्वोटो युनिव्हसिर्टीमधून पदवी घेतल्याचे सांगितले. अपेक्षित स्पर्म डोनर मिळाल्याने अपत्यप्रातीसाठी महिलेने त्याच्याशी संबंध ठेवले. मात्र, काही काळाने या जोप्याला स्पर्म डोनरची खरी ओळख पटली. तो जपानी नसून चिनी नागरिक आहे. तसेच तो क्वोटो युनिव्हर्सिटीचा पदवीधर नाही. तसेच तो विवाहित असल्याची माहिती जोडप्याला मिळाली. या माहितीनी त्यांना धक्का बसला. स्पर्म डोनरची सत्यता समजली त्यावेळी गर्भपाताची वेळ निघून गेली होती.

या जोडप्याला एक मूल आहे. मात्र, त्यांना अजून एक मूल हवे होते. महिलेच्या जोडीदारात काही अनुवंशिक आजार असल्याने संततीमध्य ते येण्याची शक्यता असल्याने त्यांनी 2019 मध्ये स्पर्म डोनरच्या माध्यमातून अपत्यप्राप्तीचा निर्णय घेतला होता. त्यांना अपेक्षित असणारा स्पर्म डोनर सोशल मिडीयाद्वारे सापडला. मात्र, त्याने ओळख लपवून त्यांची फसवणूक केली.

स्पर्म डोनरची सत्यता समजल्याने महिलेने त्याच्यापासून झालेल्या मुलाचा त्याग केला असून त्याला टोकियो चाईल्ड केअरकडे सूपूर्द करण्यात आले आहे. मुलाला एखादी वस्तू समजून त्याचा त्याग करणे अयोग्य असल्याचे बालकल्याण कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मात्र, हे मूल त्यांच्याकडे राहून त्याच्यावर अन्याय किंवा दुर्लक्ष होण्यापेक्षा एखाद्या चांगल्या पालकांकडे त्याला दत्तक देता येता येईल, असे मतही व्यक्त होत आहे.

महिलेने स्पर्म डोनरविरोधात 2 दक्षलक्ष पौंड नुकसान भरपाईचा खटला दाखल केला आहे. डोनरने ओळख लपवून केलेली फसवणूक आणि त्याच्यापासून झालेल्या अपत्याचा त्याग करण्याच्या निर्णयामुळे महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला आहे, असे तिच्या वकिलाने सांगितले. त्या डोनरने इतरांची फसवणूक करू नये, यासाठी त्याच्याविरोधात खटला दाखल केल्याचे महिलेने सांगितले.

जपानमध्ये स्पर्म डोनेशन आणि डोनरबाबत कोणतेही नियम नसल्याने त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. जपानमध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्रे खूप कमी असून ते फक्त विवाहित महिला आणि एकट्या महिलांसाठीच आहेत. जपानमध्ये अशा सुविधा देणारी फक्त 12 रुग्णालये आहेत. त्यामुळे कायदेशीर जोखीम पत्करून आणि आरोग्याला धोका असूनही अनेकजण सोशल मिडीयावर स्पर्म डोनर शोधतात आणि अपत्यप्राप्ती करतात. मात्र, त्यात अशाप्रकारे फसणूक झाल्याच्या या घटनेने आणि अपत्याचा त्याग करण्याच्या महिलेच्या निर्णयाने खळबळ उडाली आहे.