‘जरंडेश्वर’ सुरू राहिलाच पाहिजे! ईडीला साताऱयातील शेतकऱयांची ताकद दाखवून देऊ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा महाराष्ट्रातील एकमेव कारखाना ठरला आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना चालू राहिला तर, 50 हजार ऊस उत्पादक शेतकऱयांना न्याय मिळणार आहे. कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी शांत बसणार नाहीत. ईडीने राजकीय खेळातून जरंडेश्वर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास, ईडीला सातारा जिह्यातील शेतकऱयांची ताकद निश्चितपणे दाखवून देणार आहे, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी येथील सह्याद्री मंगल कार्यालयात जिह्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांसह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मंगेश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, बाळासाहेब सोळस्कर-पाटील, किरण साबळे-पाटील, संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, शिवाजीराव महाडिक, राजेंद्र भोसले, रमेश उबाळे, संजय पिसाळ, पै. सागर साळुंखे, सुरेखा पाटील, प्रतिभा बर्गे उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, जरंडेश्वर कारखाना 2010 सालापर्यंत 2500 मेट्रिक टन क्षमतेचा होता, आज हा कारखाना 10 हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त क्षमतेने चालत असून, वीज निर्मितीसह डिस्टिलरीची उभारणी केली आहे. आज कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झाले असून, 50 हजारांपेक्षा जास्त शेतकऱयांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा आणि वेळेवर पेमेंट करणारा हा कारखाना असल्याने शेतकरी त्यालाच ऊस घालत आहेत, राजकीय द्वेषातून हा कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर शेतकरी ते खपवून घेणार नाहीत, शेतकऱयांची ताकद काय असते, हे ईडीला दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला.

सुनील माने म्हणाले, ‘आजवर वेगवेगळ्या पक्षांची सरकारे केंद्रात होती, त्यांनी कधीही शेतकऱयांविषयी राजकारण केले नाही, त्यांना शेतकऱयांविषयी आस्था होती. आज केंद्रात असलेले भाजपचे सरकार ईडीचा वापर करून भाजप वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही 41 कारखान्यांची तक्रार केली आहे, मग एकटय़ा जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई का केली, त्याबाबत भाजप का बोलत नाही. आता शांत बसून चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱयांचे नुकसान होऊ नये, यासाठी लढा उभारला जाणार असून, त्या माध्यमातून ईडीला धडा शिकवू’, असा इशारा त्यांनी दिला.