
संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून स्त्री सौंदर्याचा अनोखा कलाविष्कार घेऊन प्रसिद्ध गायिका राणी वर्मा आपल्यासमोर येत आहेत. ‘जश्न-ए-हुस्न’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे.
कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. सौंदर्याचा आविष्कार म्हणून कलेकडे पाहावे लागते. रसिकतेने सौंदर्य अनुभवत कलादृष्टीच्या आगळय़ा आविष्काराचा आनंद ‘जश्न-ए-हुस्न’ या हिंदी सांगीतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे. कालातीत स्त्री सौंदर्याचं संपूर्ण विश्व मी रसिकांसमोर सादर करणार आहे, असे राणी वर्मा म्हणाल्या. ‘चौदवी का चांद’, ‘चंदन सा बदन’, ‘यह चांद सा रोशन चेहरा’, ‘भोली सूरत’, अशा जुन्या रेट्रो गीतांचा कौशल्याने वापर केला आहे. या गीतांमधून व्यक्त झालेले स्त्री रूप, तिच्या भावभावना, लोभस नृत्याविष्कारासोबत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे, असे वर्मा म्हणाल्या. कोरोना काळानंतर ‘जश्न-ए-हुस्न’ कार्यक्रम पुन्हा रसिकांसमोर येत आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम होईल.





























































