जव्हारमध्ये तीन महिन्यांपासून लसीकरण बंद; परिचारिका नसल्याने बालके, गर्भवतींचा जीव धोक्यात

जव्हार शहर नगर परिषद हद्दीतील १२ अंगणवाडी केंद्रांवर गर्भवती माता आणि बालकांना होणारे नियमित लसीकरण तसेच आरोग्य तपासणीचे काम परिचारिका नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आदिवासी बहुल भागातील महिलांचे व बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण बंद असल्याने गर्भवती माता आणि बालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठली आहे.

जव्हार शहरात पूर्वी दरमहिन्याला अंगणवाडी केंद्रांवर वैद्यकीय पथक येऊन गर्भवती मातांची तपासणी आणि बालकांचे वजन करून लसीकरण करीत होते. आवश्यकतेनुसार औषधोपचारही केले जात होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून परिचारिका नसल्यामुळे हे सर्व काम ठप्प झाले आहे. लसीकरण बंद असलेल्या केंद्रांमध्ये गोरवाडी, हनुमान पॉईंट, नवापाडा, महादेवआळी, जांभूळविहीर, साईनगर बालवाडी, गोखलेनगर, धडगाव, जुनी जव्हार, नवी जव्हार आणि सरस्वतीनगर अशा १२ अंगणवाड्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी सुमारे ३५० हून अधिक गर्भवती माता आणि ५०० पेक्षा अधिक बालकांचे लसीकरण थांबले आहे. त्यामुळे महिला व बालकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

… तर तीव्र आंदोलन छेडणार आरोग्य विभागाने तातडीने नवीन

परिचारिकांची नियुक्ती करून लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करावीत. लसीकरण केंद्रे बंद असल्यामुळे गर्भवती माता आणि बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जर ही लसीकरण केंद्रे तातडीने सुरू झाली नाहीत तर व्यापक प्रमाणात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदिवासी युवा संघाचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिला आहे. माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या शिष्टमंडळाने पतंगशहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कावळे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.