एक नंबर हा एक नंबरच असतो…! लाडक्या बहिणींचा फायदा झाला, पण महाराष्ट्राचा मोठा तोटाच; जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंना डिवचले

लाडकी बहीण योजनेवरील चर्चेत भाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी आज विधानसभेत तुफान टोलेबाजी करून एकनाथ शिंदेंपासून शंभूराज देसाई यांना जोरदार चिमटे काढले. सरकारमधील क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या पदावरून शिंदे गटाला डिवचताना ‘एक नंबर हा एक नंबरच असतो’ असे सांगत शिंदे गटाला चांगलेच कोंडीत पकडले.

लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. तुमचे राज्य सरकार येण्यात लाडक्या बहिणींचा फायदा झाला, पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरवर जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा मोठा तोटा झाला, असे सांगताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला.

त्यावर आमच्यात एक नंबर दोन नंबर अदली बदली करीत असतो, दोन नंबर हा कायम दोन नंबरच नसतो, असे स्पष्टीकरण मंत्री शंभुराज देसाई करण्याचा प्रयत्न करीत होते. पण भाषणात अधिक रंगत आणताना, शंभुराज देसाई यांच्याकडे बोट दाखवत जयंत पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदेसाहेब, असल्याच लोकांनी तुमचे नुकसान केलं आहे आणि तुम्हाला हे सारखं समजावून सांगत आहेत. पण एक नंबर हा एक नंबरच असतो. आणि या योजनेचा काय परिणाम झाला तर तुम्ही या ठिकाणी येण्याऐवजी तिकडे गेलात आणि जे प्रमुख (एकनाथ शिंदे) ज्यांनी हे लोक आणायचे काम केले त्या माणसावर अन्याय होतोय, असे आम्हाला वाटायला लागले आहे. त्यामुळे जर एक नंबरचा दोन नंबरवर जाऊ शकतो, तर दोन नंबरचा एक नंबरवरही जाऊ शकतो. मात्र आता एक नंबर (देवेंद्र फडणवीस) सभागृहात नाहीत म्हणून तुम्ही म्हणत आहात. त्यामुळे दोन नंबरचा माणूस एक नंबरला जाणार आहे, एवढे तुम्ही जाहीर करा. आमचे काही म्हणणे नाही, असे जयंत पाटील यांनी सांगताच सभागृहातील दोन्ही बाजूच्या बाकांवरील सदस्यांमध्ये हास्याचा विस्फोट झाला.