
वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी शासकीय सेवेतील सेवानिवृत्तीची मर्यादा 58 वर्षे वयावरून 60 वर्षे करू नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे, असे जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे. ‘सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवल्यास आगामी दोन वर्षांत शासन सेवेतून निवृत्त होणाऱया कर्मचाऱयांचे प्रमाण नगण्य होईल. पर्यायाने शासनातील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरू उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार नाही. तसेच ज्यांच्याकडे सरकारी नोकरी मिळवण्याच्या शेवटच्या दोन संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमुळे अपात्र होतील आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल,’ अशी चिंता व्यक्त करत तरुण पिढीत असंतोष निर्माण होईल व मोठय़ा प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.


























































