भरावाची माती काढत असताना कोळंब पुलाखाली ‘जेसीबी’ अडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

दुरुस्ती पूर्ण झालेल्या कोळंब पुलाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत अशी स्थिती आजही कायम आहे. पुलाखालील मोठ्या प्रमाणात टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यापर्यंत कायम राहिल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्याप प्रमाणात अडविण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी नंतर हा भराव हटविण्यासाठी आणण्यात आलेली जेसीबी मशीन मातीचा भराव व दलदलीत खोलवर रुतून पडल्याची घटना शनिवारी कोळंब पुलाखाली घडली.

दरम्यान, काही ग्रामस्थांनी त्याचे फोटो सोशल मिडीयावर टाकून बांधकाम विभाग आणि ठेकेदाराचा कारभार पहा असे सूचित केले आहे. जेसीबी मशीन रुतला मात्र सुदैवाने या घटनेत चालक बचवला आहे. अशी माहिती मिळाली. एकूणच दुरुस्ती नंतरही कोळंब पुलाच्या समस्या आजही कायम आहेत.

तीन वर्षाच्या  प्रतिक्षेनंतर कोळंब  पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असे सांगण्यात येत आहे. मात्र मर्यादित क्षमतेच्या वाहतूकिसाठीच पूल योग्य असल्याचा अहवाल बांधकामच्या वरिष्ठ विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे पुला खाली टाकण्यात आलेला भराव आजहि त्याच स्थितीत आहे. मालवणच्या  बाजूने असलेली संरक्षक भिंत कोसळली असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक कामे अपूर्ण असताना शनिवारी दुपारी पुलाखालील बंधाऱ्याची माती काढण्यासाठी आलेला जेसीबी मातीतच अडकून पडल्याने बांधकाम विभग व ठेकेदार यांच्या कार्य पद्धतीवर व कामा बाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. बांधकाम विभाग आता तरी लक्ष देऊन कार्यवाही करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

महिनाभरापूर्वी होते तहसीलदाराचे आदेश 

कोळंब पुला खालील मातीचा भरावा तात्काळ हटविण्यात यावा या बाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर तहसीलदार अजय पाटणे यांनी तत्काळ मातीचा बंधारा हटवावा या बाबत आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाची कार्यतत्परपणे कार्यवाही करण्याचे सौजन्य दाखवले गेले नाही. जो भराव मे महिन्यापूर्वी काढणे गरजेचे होते तो भराव पावसात काढण्यास सुरुवात केल्याने जेसीबी अडकल्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे.