युद्धसमाप्तीच्या चर्चेसाठी जेडी व्हान्स पाकिस्तान दौऱ्यावर जाणार? इस्लामाबादमध्ये होणार महत्त्वाची बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखीत देशातील वाढता तणाव आणि इराणसोबत सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून इराणसोबतच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला जात आहे. विशेष म्हणजे, इराणने ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानने या चर्चेसाठी जेडी व्हान्स यांच्या नावाचा आग्रह धरला होता, त्यामुळे आता व्हान्स यांच्या खांद्यावर वाटाघाटींची मोठी जबाबदारी येण्याची चिन्हे आहेत.

व्हाईट हाऊसने या बदलाबाबत सावध प्रतिक्रिया दिली असून, उपराष्ट्रपतींच्या या भूमिकेला विशेष महत्त्व देण्याऐवजी ती एक नियमित प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. प्रेस सेक्रेटरी कॅरोलाइन लिव्हिट यांनी स्पष्ट केले की, जेडी व्हान्स हे नेहमीच राष्ट्रपतींचे उजवे हात आणि राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे महत्त्वाचे सदस्य राहिले आहेत. अध्यक्ष ट्रम्प सर्व महत्त्वाच्या परदेशी आणि देशांतर्गत विषयांवर त्यांचा सल्ला घेतात, त्यामुळे या चर्चेत त्यांचा सहभाग असणे स्वाभाविक आहे. मात्र, इराणच्या वतीने या चर्चेत नेमके कोण सहभागी होणार, याबाबत लिव्हिट यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मध्यपूर्वेतील युद्ध संपवण्यासाठी आपला देश ‘अर्थपूर्ण आणि निर्णायक चर्चा’ घडवून आणण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने स्वतःला अमेरिका आणि इराणमधील चर्चेसाठी एक सुरक्षित आणि तटस्थ ठिकाण म्हणून सादर केले आहे. ‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, महिनाभरापूर्वी सुरू झालेले हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी इस्लामाबादमध्ये एकत्र येऊ शकतात. जेडी व्हान्स यांच्या या संभाव्य दौऱ्याची वेळ आणि ठिकाण अद्याप गोपनीय ठेवण्यात आले असले तरी, या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विटकॉफ आणि कुशनर यांच्याऐवजी आता व्हान्स यांच्या मध्यस्थीने हा तिढा सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.