
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या परदेशवारीचा निर्णय जूनपर्यंत लांबणीवर पडला आहे. त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना पुढील महिनाभर विदेशात प्रवास करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिली, मात्र गंभीर घोटाळा तपास विभाग आणि ईडीच्या विरोधामुळे न्यायालयाने नरेश गोयल यांना तातडीने परवानगी देण्यास नकार दिला.
गोयल दाम्पत्याने 7 हजार कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी जारी केलेल्या लूकआउट नोटिसा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचा तपास 2019पासून संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास येताच खंडपीठाने गंभीर घोटाळा तपास विभागावर (एसएफआयओ) ताशेरे ओढले. यावेळी एसएफआयओच्या वतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली. 2019पासून सुरू असलेला तपास यंदा सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी अॅड. वेणेगावकर यांनी नरेश गोयल यांचा परदेश प्रवासाला विरोध दर्शवला, त्यावर गोयल यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ दिला. त्यानंतर न्यायालयाने नरेश यांच्या परदेशवारीची सुनावणी जूनपर्यंत तहकूब केली. मात्र अनिता यांच्याविरोधातील तीन लुकआउट नोटीस महिनाभरासाठी निलंबित करीत त्यांना परदेशात फिरण्यास मुभा दिली.


























































