सुवर्ण कारागीर दैवज्ञसखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयवंत मालणकर  << [email protected] >>

सोनं हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवून ते परिधान करून मिरवण्याची हौस सर्वच स्त्रियांना असते, पण सोन्याचे दागिने घडविणाऱया महिला सापडणं तसं दुर्मिळच. या दुर्मिळ मालिकेत बसणाऱया ठाण्याच्या आरती विजय मालडीकर या गेली 50 वर्षे सुवर्णालंकार घडविण्याच्या व्यवसायात असून सध्याच्या युगातील नावीन्यपूर्ण दागिन्यांवर त्या संशोधन करीत आहेत.

आरतीचं माहेर मुरबाडचं. न्यू इंग्लिश स्कूल, मुरबाड येथे वाणिज्य शाखेत 12 वीपर्यंत शिक्षण. वडील स्व.भालचंद्र गजानन देहेरकर यांच्याकडून सुवर्ण कारागिरीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळत गेले होते. तिच्या वडिलांचा सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यवसाय होता. आरती लहानपणापासूनच वडिलांच्या व्यवसायात लुडबुड करायची. सोनं शुद्ध करण्याची प्रक्रिया, मुशीमध्ये पावडर भरून त्याला उष्णता देणे हे आरती खेळता खेळताच शिकली. त्यामुळे वडिलांच्या गैरहजेरीत लहान असूनही कामाची जबाबदारी निभावून नेण्याची कुवत तिच्यामध्ये आपसूकच निर्माण झाली. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं आरतीच्या बाबतीत ते काही अंशी लागू पडतं.  इयत्ता 6 वीत असताना आरतीने स्वतच्या आईसाठी एक मंगळसूत्र तयार केले होते. त्या पहिल्या यशस्वी कामाची पोचपावती म्हणजे तिच्या वडिलांकडे येणारे ग्राहक तिच्याकडे येऊन दागिन्यांची नक्षी-कलाकुसर तिला विचारू लागले. स्वतची ही दागिन्यांची आवड पुढेही म्हणजे लग्नानंतर जोपासता यावी यासाठी आरतीने भावी पती म्हणून सुवर्णकार युवकच निवडून मुंबईला राहणाऱया विजय एकनाथ मालडीकर या युवकाशी विवाह केला. लग्न झाल्यावर आरती मुंबईला आली. दैवज्ञ समाज हा जरी सुवर्णकारांचा असला तरी या समाजातल्या स्त्रिया मात्र कारागिरीच्या व्यवसायात येत नाहीत. त्यामुळे आरतीनेदेखील या व्यवसायात येण्याची जर तिची इच्छा असेल तर ती तिचा निर्णय घेऊ शकते अशी मुभा आरतीला सासऱयांनी दिली होती. त्यामुळे आरतीने जराही मागे वळून न पाहता पुन्हा कामाला सुरुवात केली.

आरतीकडे येणारी सोन्याच्या दागिन्यांची मागणी ही प्रामुख्याने  व्यापारी, ग्राहक स्वरूपाची आहे. आरतीकडे एखादा दागिना जसे बाजूबंद, हार किंवा अंगठी बनवण्यासाठी ग्राहक आला की, सर्वप्रथम ग्राहकाने आणलेल्या जुन्या सोन्यातील अशुद्धपणा बाजूला करावा लागतो. त्यासाठी चांदी, सोनं किंवा तांबं वापरून रसायनाच्या सहाय्याने परीक्षानळी, काचेचा चंबू अशी साधने वापरून तो दूर करावा लागतो. त्यानंतर तयार होणारी कॉफीसारखी बारीक पूड मुशीत ठेवून त्याला उष्णता देऊन शुद्ध सोन्याचे वळे तयार केले जाते. मग त्या वळ्यापासून तयार करायचा दागिना घडवायला आरती सुरुवात करते. सोन्याच्या दागिन्यावर पूर्वी जे नक्षीकाम करत ते खिळ्याने केले जायचे. सोनारांच्या भाषेत त्याला ‘खिळा पॅटर्न’ असे म्हणतात. आता मात्र  मशीनवर कलाकुसर करून दागिने घडवले जातात.  कोणत्याही सुवर्णकाराला  केवळ नाजूक काम करता येणं आवश्यक नसतं, तर त्या कामाचं प्रमाण, मग त्या दागिन्याची  घडणावळ ठरविता येणं सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे एखाद्या दागिना एका विशिष्ट तोळ्यामध्ये बसवायचा असेल तर त्यामध्यील ठिपके किती ग्रॅमचे, टिकल्या किती ग्रामच्या, हे सर्व प्रमाण कारागिराला अंदाज करून ठरविता येणे आवश्यक असतं. या अंदाजाला सोनारांच्या भाषेत ‘वेत्रण’ म्हणतात. शिवाय त्याच्या हातामध्ये नाजूकपणा  हवा असतो. हाही एक त्याचा आवश्यक गुण ठरतो. आज  आरतीला या व्यवसायात 50 वर्षे झाल्याने या सर्व मूलभूत बाबी तिने चांगल्याच आत्मसात केल्या आहेत.

ज्या प्रकारचे दागिने प्रचलीत आणि सर्रासपणे वापरले जात आहेत त्यामध्ये बंगाली पॅटर्न हा नमुना प्रसिद्ध आहे,  पण तरीही सोन्याच्या दागिन्यांच्या नक्षीनुसार  नेहमीच त्यांच्या किमती वरखाली होत असतात. त्यामुळे आरतीला आपल्या व्यवसायात कार्यतत्परता आणण्यासाठी नेहमीच शोधक नजर ठेवावी लागते. कोणतेही ज्वेलरी डिझाईनचे शैक्षणिक ज्ञान न घेता स्वतच्या अनुभवातून आणि सासर – माहेरच्या प्रोत्साहनपर सहकार्यानेच आज आरती पुढे जात आहे.  दागिन्यावर  मिनाकारी करणारे आणि नक्षीकामात तरबेज असणारे पती विजय मालडीकर यांचे अनमोल सहकार्य तिला अती महत्त्वाचे वाटते . तसेच आपल्या वडिलांना ती व्यवसायात गुरुस्थानी मानते.  जगन्नाथ पेडणेकर, सूर्यकांत साने, दत्ताजी घोसाळकर, दीनानाथ गुहागरकर, मनोहर पालशेतकर, अजित पेंडूरकर, महेश वैद्य यांना ती व्यवसायात आदर्श मानते. ज्याला शिकायचे असेल तर तो मन लावून शिकू शकतो, त्यासाठी रूढ शिक्षण घ्यायलाच हवे असे नाही असे आरती म्हणते. ती सुवर्णकलेवर  संशोधन करून  समाजातील होतकरू मुलांना आजही शिक्षण  देत आहे, पण अजूनही तिच्या समाजातल्या स्त्रिया या क्षेत्रात येत नाहीत याची खंत नेहमीच तिला वाटते.  मुंबईतील लालबाग परिसरात मराठी सुवर्णकारांचं बस्तान चांगलंच आहे. तेथील जाणकार सुवर्णकारांनी आरतीची कारागिरीविषयी माहिती घेतली. विजय धारगळकर, सत्यविजय मोंडकर यांनी खऱया अर्थाने आरतीला दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या मुख्य प्रवाहात आणले.

सुवर्ण कारागिरीबरोबरच सुवर्ण मूल्यांकन, चटईचा बाजूबंद विणणे, शिवणकला, पाककला इत्यादीमध्येही आरती तरबेज आहे. येणाऱया काळात सोने, चांदी, हिरे, मोत्याच्या नावीन्यपूर्ण दागिन्यावर संशोधन करण्याचा तिचा मानस आहे.

अशी दैवज्ञसखी आरती म्हणजे  कायम उत्साहाचं, चैतन्याचं सळसळतं असं व्यक्तिमत्त्व आहे. सर्वांना आपलंसं करून ती परिषदेचा महिला विभाग समर्थपणे सांभाळत आहे. तिच्या सुंदर आणि सुबक सुवर्ण कारागिरीची दखल दैवज्ञ समाजाने घेतली आहे. आपल्या पारंपरिक सुवर्ण व्यवसायाशी एकनिष्ठ राहणारी आरती म्हणजे दैवज्ञ समाजाचा अनमोल ठेवा आहे.

1996 ला सातारा येथील दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या साहित्य संमेलनात आरतीला व्यासपीठावर महिलांचे सक्षमीकरण, सुवर्ण व्यवसायातील अडीअडचणी, महिलांचे व्यवसायातील योगदान यावर बोलण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत आरतीने 20 मिनिटांच्या छोटेखानी भाषणात उपस्थितांची वाहवा मिळवली. त्या वेळी आरतीला काहीसा थोडय़ा वेळासाठी का होईना, सेलिब्रिटी होण्याचा आनंद  मिळाला होता. या वेळी समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथ पेडणेकर, स्व. जगन्नाथ कारेकर, रवींद्र माहिमकर, रवींद्र गावणकर यांनी आरतीचे कौतुक केले आणि याचीच पोचपावती म्हणून परिषदेने आरतीला ‘महिलाप्रमुख’ हे पद बहाल केले. आजही सदरहू पदावर आरती जोमाने काम करत आहे. महिलांसाठी आरोग्य शिबीर, वधू  मेळावा, महिला मेळावा आदी समाजोपयोगी कार्यक्रम आरती घेते. 2012 साली कोल्हापूर दैवज्ञ महिला समाजाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, विश्वास नांगरे-पाटील आणि कायदेतज्ञ अपर्णा रामतीर्थकर यांच्या समवेत आरतीला व्यासपीठावर बसून बोलण्याची संधी मिळाली होती.