खतरनाक नक्षली दिनेश गोप जेरबंद! शिरावर 30 लाखांचे इनाम, झारखंड पोलिसांच्या मदतीने एनआयएची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरावर 30 लाखांचे इनाम असलेला पीएलएफआयचा प्रमुख दिनेश गोप याला नेपाळची राजधानी काठमांडूत जेरबंद करण्यात आले. एनआयए आणि नेपाळ पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. दिनेश हा दोन बायकांसह काठमांडूत शिखांच्या वेशात राहत होता.

30 जानेवारी 2022 रोजी एनआयएने टेरर फंडिगचा तपास करताना पीएलएफआय या माओवादी संघटनेचा प्रमुख दिनेश गोप याच्या हीरादेवी आणि शकुंतला कुमारी या दोन बायकांना अटक केली होती. या दोघींवर शेल कंपन्यांमध्ये खंडणीचा पैसा गुंतवल्याचा आरोप होता. चौकशीत या आरोपाची पुष्टी झाली. यापूर्वी पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2016 रोजी रांचीतून दिनेश गोप याच्याकडून जवळपास 25 लाख रुपये जप्त केले होते. तेव्हापासून गोप हा फरारच होता.

दिनेश गोप याच्यावर 25 पेक्षा जास्त गुन्हे आहेत. कंत्राटदार, व्यावसायिकांना धमकावणे, खंडणी वसूल करणे आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. कित्येक वर्षांपासून झारखंड पोलीस दिनेश गोपच्या शोधात होते. दिनेश काठमांडूत लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर झारखंड पोलीस आणि एनआयएने संयुक्त कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. झारखंड पोलिसांनी त्याच्यावर डोक्यावर 25 लाखांचे इनाम ठेवले होते. तर एनआयएनेही 5 लाखांचे इनाम ठेवले होते.