
>> प्रसाद पाटील
हिंदवी स्वराज्याच्या जननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पाचाड येथील राजवाड्याला सध्या बांडगुळांचा ‘वेढा’ पडला आहे. वाड्यात ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष, गवत वाढल्याने तटबंदी, वाड्याच्या भिंती तसेच पाया ढासळत आहे. मात्र महाराष्ट्राचे शक्तिपीठ असलेल्या जिजाऊंच्या या वाड्याच्या डागडुजीकडे सातत्याने कानाडोळा केला जात असल्याने पाचाडचा हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती आहे. याबाबत अनेकदा शिवप्रेमींनी आवाज उठवूनही पुरातत्व खात्याच्या भोंगळ कारभाराची ‘फंदफितुरी’ सुरूच आहे. त्यामुळे संवर्धनाकडे दुर्लक्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासावर मोगलाईचा वरवंटा फिरवणाऱ्या केंद्राला इतिहास माफ करणार नाही, असा संताप शिवभक्तांनी व्यक्त केला आहे.
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी भव्य वाडा बांधला होता. शेकडो वर्षे हा वाडा इतिहासाची साक्ष देत आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या या वाड्याची देखभाल-दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे तटबंदी, वाड्याच्या भिंती तसेच वाड्याचा पाया भेदून मोठमोठी झाडे बाहेर आली आहेत. दोन-तीन फूट उंच गवत वाढल्याने या वाड्याची रयाच गेली आहे. याबाबत अनेकदा शिवप्रेमींनी तक्रार करूनही पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी कानाडोळा करत असल्याने वाड्याच्या भिंती, आतील विहिरी ढासळू लागल्या आहेत. ही भयंकर परिस्थिती अशीच सुरू राहिल्यास इतिहासाचा हा पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे.
पुरातत्व खात्याच्या कारभाराची ‘फंदफितुरी’, लोखंडी दरवाजाला चिंध्यांची बिजागरी
रायगड प्राधिकरणाने मुख्य रस्ता ते राजवाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत केवळ पायऱ्या बांधल्या आहेत. मात्र आतील बाजूस असलेल्या वास्तू पुन्हा उभ्या करण्यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. वाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या लोखंडी दरवाजाला चक्क कापडी चिंध्यांची बिजागरी बांधली आहेत. मुख्य रस्त्यावरील फलकावर जिजामाता वाडा असा एकेरी उल्लेख केला आहे. याबाबत शिवभक्त शंतनू वाघमारे यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, वाड्यातील उत्खनन तसेच तटबंदीचे संवर्धन करण्यासंदर्भातील प्रस्ताव कोविड काळामध्ये पुरातत्व खात्याला सादर करण्यात आला होता. मात्र त्यावर अद्याप निर्णयच घेतला नसल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
वाड्यात जुन्या पद्धतीने लाईन काँक्रीटीकरण करण्यात येणार असून गवत आणि तत्सम वृक्ष पुन्हा येऊ नये अशा शास्त्रीय पद्धतीने समूळ उच्चाटन केले जाईल. तसेच भिंतीवर येणारे वृक्षदेखील यापुढे येऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे काम सप्टेंबर महिन्यात केले जाणार आहे.
राजेश दिवेकर, (संरक्षण सहाय्यक, पुरातत्व विभाग)