ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला व्यवस्थेपुढे गुडघे टेकावे लागले, जितेंद्र आव्हाड यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. देशभरातून साक्षी मलिक हिला पाठिंबा मिळत आहे. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांचीच कुस्ती महासंघाच्या अध्य़क्षपदी निवड झाल्याने साक्षीने निवृत्ती घोषीत केली.

साक्षीच्या निवृत्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साक्षीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. साक्षीचा राजीनामा हा देशाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ”खरंतर हा ‘देशाचा अपमान’ आहे. देशाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला नाईलाजास्तव व्यवस्थेपुढे गुढघे टेकावे लागले आहेत. देशाला पदक मिळवून देणारी मुलगी आजही आपल्या हक्कांसाठी भांडतेय आणि तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे उपराष्ट्रपती जगदिप धनखर ‘जाट’ आहेत. त्यांची मिमिक्री केल्याने ‘जाट’ समाजाचा अपमान झाला असं बोललं जातं. दुसरीकडे साक्षी मलिक पण ‘जाट’ आहे.लैंगिक शोषणाविरूद्ध या खेळाडूने रस्त्यांवर उतरून न्यायाची मागणी केली,परंतु तिला अद्याप न्याय मिळालेला नाही, मग हा ‘जाट’ समाजाचा अपमान नाही का?”, असा सवाल आव्हाड यांनी या पोस्टमधून केलायय.