
सामना प्रतिनिधी । पुणे
जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकीवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये त्यांनी अटक टाळण्यासाठी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळून लावले. त्यामुळे मानकर यांच्या पुढील अडचणींमध्ये भर पडली आहे.
समर्थ पोलीस ठाण्यासमोरील जमीनीच्या वादातून दीपक मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकाविल्याने जितेंद्र जगताप यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. यामध्ये सातजणांवर गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. घोरपडे पेठ), सुधीर सुतार (वय ३०, रा. कोथरूड), अमित तनपुरे (वय २८, रा. मांडवी), अतुल पवार (वय ३६), विशांत कांबळे (वय ३०, रा. येरवडा) यांना अटक केली आहे. मानकर व कर्नाटकी अद्यापि पसार आहेत. मानकर आणि कर्नाटकी यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले. यावेळी जितेंद्र जगताप हे जागेच्या वादातून आम्हाला ब्लॅकमेल करीत होते. पैसे नाही दिले तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्यांनी दिली होती. न्यायालयानेही आमच्या बाजूने या जागेचा निकाल दिला आहे, असा युक्तिवाद मानकर यांचे वकील अॅड. सुधीर शहा, कर्नाटकी यांचे वकील अॅड. हृषीकेश गानू यांनी केला. मात्र, न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळून लावले.
































































