जम्मू–कश्मीरात रुग्णालयावर हल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जम्मू

जम्मू-कश्मीरात किश्तवाडमधील रुग्णालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या बॉडीगार्डचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कराला बोलवण्यात आले आहे.

दुपारी 12.30च्या सुमारास बुरखाधारी दहशतवादी रुग्णालयात घुसले आणि संघाचे नेते चंद्रकांत शर्मा यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यात चंद्रकांत शर्मा गंभीर जखमी झाले. तर त्यांचा बॉडीगार्ड राजिंदर याचा जागीच मृत्यू झाला. शर्मा यांना हेलिकॉप्टरने जम्मूत हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच शर्मा यांचा मृत्यू झाला.

प्रचंड घबराट; तणाव वाढला

रुग्णालयात गोळीबार होताच प्रचंड घबराट पसरली. रुग्ण आणि नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. प्राण वाचवण्यासाठी रुग्णांनी मिळेल त्या दिशेने धाव घेतली. हल्ल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून तणाव वाढला आहे. किश्तवाड शहरासह जिल्हय़ात संचारबंदी लागू केली आहे. लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

बुरखाधारी दहशतवादी पुरुष की महिला?

दहशतवाद्यांनी बुरखा घातलेला होता. त्यामुळे हल्ला करणारे दहशतवादी पुरुष आहेत की महिला, याचा शोध पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी बॉडीगार्ड असलेले ‘पीएसओ’ राजिंदर यांची रायफल पळवून नेल्याचे वृत्त आहे.