
गौरव राणे आणि कश्यप बरनवाल या मुंबईकरांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे, वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविसकर या जळगावच्या खेळाडूंनी महिला दुहेरीचे जेतेपद उंचावले. हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांना गौरविण्यात आले.
जल मंगल दीप यूथ क्लब (जेमडीवायसी) आणि रोट्रक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेला अखिल हिंदुस्थानी पिकलबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांची मान्यता होती. विलेपार्लेच्या प्रबोधनकार क्रीडा ठाकरे संपुलाच्या गौरव-कश्यप यांनी नियंत्रित खेळ करताना मिहिर खंडेलवाल आणि प्रणव धोईपह्डे यांचा सरळ दोन सेटमध्ये 11-9, 11-8 असा पराभव केला. महिलांमध्ये वृषाली-साक्षी यांनीही सरळ दोन सेटमध्ये जेतेपद निश्चित करताना संभाजीनगरच्या आदिती जगताप आणि करिष्मा कालिके यांना 11-7, 11-5 असे नमविले.
सौम्या–आर्याला रौप्य
16 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात राजस्थानच्या तन सिंग शेखावत-अभिमन्यू शेखावत यांनी जेतेपद पटकावताना यश गायकवाड-तेजस गायकवाड या संभाजीनगरच्या खेळाडूंना 9-11, 11-8, 11-7 असे नमवले. 16 वर्षांखालील मुलींमध्ये सम्राज्ञी परदेशी-कोमल राजदेव यांनी बाजी मारताना सौम्या लेले-आर्या कोकाटे यांचा 15-4 असा एकतर्फी पराभव केला. आर्या कोकाटे व सौम्या लेले यांनी रौप्य पदक जिंकले. वैष्णवी लिमण व लक्षिता चितळे यांनी कांस्य पदक पटकावले.




























































