खनिज उद्योगात स्थानिकांना रोजगार देणार -सुभाष देसाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
subhas-desai-in-job-fair

सामना प्रतिनिधी । नागपूर

विदर्भाचा भाग खनिजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. यामुळे खनिकर्मावर आधारित खनिज प्रक्रिया उद्योग यापुढे येथेच स्थापन करून 80 टक्के स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

विदर्भातील तरुणांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उद्योग विभाग आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीजवळील ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले हायस्कूल सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उद्योगमंत्री बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आशीष जयस्वाल, अतिरिक्त उद्योग संचालक व्ही. एल. राजाळे, जिल्हा परिषद सदस्या नंदा लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात उद्योजकांची गुंतवणूक वाढावी, नवनवीन उद्योग यावे आणि या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त व्हावा या दृष्टीने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा राज्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी पुणे, वाशी-नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर, गोरेगाव-मुंबई, संभाजीनगर असे विभागस्तरीय रोजगार मेळावे संपन्न झाले आहेत.

विदर्भ हा उद्योग क्षेत्रात भरारी घेत असून देशांतर्गत व देशाबाहेरील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योगांना लागणारे पूरक वातावरण उद्योग विभागाकडून निर्माण करण्यात येत आहे. उद्योगधंद्यांना कौशल्ययुक्त उमेदवारांची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ शालेय व महाविद्यालयीन शिक्षणावरच अवलंबून न राहता आपल्यातील कौशल्य विकसित करावे. आजच्या स्पर्धेच्या युगात मागे न राहता प्रत्येकाने कौशल्य विकसित करून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केले.

9 फेब्रुवारीला खनिज परिषद

विदर्भात विपुल प्रमाणात खनिज उपलब्ध आहे. खनिजावर आधारित उद्योग येथे सुरू व्हावे याकरिता येत्या 9 फेब्रुवारी रोजी नागपुरात राष्ट्रीय खनिज परिषद आयोजित करण्यात आली आहे.