
अत्यंत प्राचीन अशा जोगेश्वरी गुंफेचे राज्य सरकारच्या माध्यमातून सौंदर्यीकरण व सक्षमीकरण झाल्यास पर्यटन क्षेत्राला नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे या गुंफेचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी विनंती आमदार रवींद्र वायकर यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
जोगेश्वरी गुंफा ही प्राचीन व इतिहासकालीन पुरातन वास्तू असून या गुंफेचा पुरातन व ऐतिहासिक वारसा जपणाऱया वास्तूंच्या यादीत प्रथम दर्जा श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुरातन वास्तूचे जतन व्हावे म्हणून सुरुवातीस गुंफेच्या केंद्रबिंदूपासून 500 मीटरपर्यंतचे क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले, मात्र येथील दाट लोकवस्तीचा विचार करता या नियमात शिथिलता आणून गुंफेपासून 25 मीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच 100 मीटर परिघात कोणत्याही खासगी बांधकामास बंदी आणली आहे. या वास्तूंचा विकास करण्याचे महाराष्ट्र सरकारचे धोरण असून सरकारच्या माध्यमातून त्याचे सौंदर्यीकरण करणे निश्चित करण्यात आले आहे.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात अति प्राचीन पांडवकालीन गुंफेचा विकास, त्याचे सौंदर्य व पुरातत्त्व बाबी याची जपणूक करून सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. ही गुंफा पाहण्यासाठी देशविदेशातील अनेक पर्यटक येतात. या गुंफेच्या परिसराचे सौंदर्यीकरण व सक्षमीकरण करून येथील पर्यटकांच्या सुविधेत सुनियोजित वाढ केल्यास येथील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असे मतही वायकर यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. त्यामुळे जोगेश्वरी गुंफेच्या सौंदर्यीकरण व सक्षमीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध झाल्यास गुंफेचा विकास करणे शक्य होणार असल्याने निधी उपलब्ध देण्यात यावा, अशी विनंती वायकर यांनी पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांना केली आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, मुंबई महानगरपालिका आयुक्त, भारतीय पुरातत्त्व अधीक्षक, के पूर्वचे सहाय्यक आयुक्त यांनादेखील याविषयीचे पत्र पाठविले आहे.



























































