
दुखापतीतून सावरल्यानंतर लय पुन्हा प्राप्त करण्यासाठी मैदानावर उतरून खेळण्यापेक्षा चांगले काहीही नाही. सामन्यादरम्यान मैदानात उतरल्यानंतरच खऱ्या अर्थाने सराव होत असतो. दुखापतीतून मी सावरलो असून, आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून मिळणारा अनुभव हा मला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत नक्कीच कामी येईल. लय पुन्हा येण्यासाठी आयपीएलपेक्षा चांगले ठिकाण नाही, असा विश्वास बंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने व्यक्त करत या स्पर्धेची पाठराखण केली.
खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर परतलेल्या जोश हेझलवूडच्या चेंडूने पंजाब विरूद्धच्या प्ले ऑफच्या लढतीत आग ओकली. दुखापतीतून परतल्या नंतरही हेझलवूडची भेदकता कमी झाली नव्हती. पंजाबविरुद्धच्या सामन्यात हेझलवूडने 3.1 षटकात 21 धावा देत तीन विकेट घेत पंजाबच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आरसीबीने पंजाबवर 8 गडी राखून विजय मिळवला. 2016 नंतर प्रथम आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला.
हेझलवूड म्हणाला, दुखापतीनंतर लय मिळवण्यासाठी मैदानावर खेळणे अत्यंत महत्वाचे असते. त्यापेक्षा चांगला सराव कोठेही होऊ शकत नाही. डब्ल्यूटीसी फायनलच्या तयारीसाठी मला गोलंदाजी करावी लागते. अर्थातच तुम्हाला कसोटीसाठी वेळोवेळी अधिक गोलंदाजी करावी लागते आणि अधिक सराव करावा लागतो. मी आज कसोटी सामन्यांमध्ये जवळजवळ त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो जशी मी गोलंदाजी करतो.
गेल्या काही आठवड्यात मी माझ्या खांद्यावर खूप मेहनत घेतली आहे. गेल्या 10 दिवसांत चांगली गोलंदाजी केली आहे. कालच्या सामन्यात खेळपट्टी मदत करत होती. मला वेगवान यॉर्कर किंवा अतिरिक्त प्रयत्न करावे लागले नाहीत.