जेएसडब्ल्यू राज्यात जलविद्युत, पवन ऊर्जा प्रकल्प उभारणार; 35 हजार कोटींचा सामंजस्य करार

राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून आज प्रख्यात जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य सरकारबरोबर सुमारे 35 हजार 500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्य़ा केल्या. या करारानुसार नाशिकमध्ये जल विद्युत उर्जा तर कोल्हापूर-साता-यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल.

या  करारानुसार जेएसडब्ल्यू कंपनी जल विद्युत  व पवन ऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे. नाशिक जिह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा जल विद्युत ऊर्जा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भिवली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. कोल्हापूर,  सोलापूर धाराशीव,  सातारा जिह्यात 5 हजार मेगा वॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. 1879 हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे 30 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्य़ा करण्यात आल्या. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसड्ब्लू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी उपस्थित होते.  

या दोन्ही सामंजस्य करारामुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल.- सुभाष देसाई,  उद्योगमंत्री

आपली प्रतिक्रिया द्या