जुही चावलाने दिला प्लास्टिकला पर्याय, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

प्लास्टिकच्या वापरामुळे वाढत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी शिवसेना भाजप युतीच्या सरकारने प्लास्टिकवर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. ही प्लास्टिक बंदी संपूर्ण राज्यात प्रभावीपणे लागू झाली आहे. महाराष्ट्राप्रमाणे इंडोनेशियात देखील प्लास्टिकवर बंदी घातली आहे. मात्र तिथे वापरण्यात येणाऱ्या अनोख्या इको फ्रेंडली व काही क्षणातच विघटन होणाऱ्या पिशव्यांचा एक व्हिडीओ अभिनेत्री जुही चावलाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तशाप्रकारच्या पिशव्या हिंदुस्थानात देखील आणल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे.

जुही चावला सध्या कुटुंबासोबत बाली येथे फिरायला गेली आहे. तिथून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत प्लास्टिक सारखी दिसणारीच एक पिशवी असून ती पिशवी ती पाण्याच्या ग्लासात टाकताच काही वेळातच ती विरघळायला लागते. ही पिशवी कासावा या वृक्षाच्या मूळापासून बनविण्यात आलेली आहे असे सांगत जुहीने अशा पिशव्या हिंदुस्थानात देखील मिळू देत असे ट्विट केले आहे.