
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटल्याने दहापैकी चार जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आली असून या ठिकाणच्या आरोग्य सुविधा पालिकेच्या प्रमुख उपनगरीय आणि नव्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासाठी बंद करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील बेड, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरची यादी तयार करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बंद करण्यात आलेल्या चार जम्बो कोविड सेंटरमधील पाच हजार बेड, 200 आयसीयू आणि 100 व्हेंटिलेटरचा समावेश आहे.
मुंबईत डिसेंबरच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट आली. यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात 250 पर्यंत खाली आलेली रुग्णसंख्या थेट 20 हजारांवर गेल्याने पालिकेसह राज्य सरकारचेही टेन्शन वाढले होते. मात्र एका महिन्यातच कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सध्या दररोज सुमारे 20 हजार चाचण्या होत असताना शंभरपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पालिकेने दहिसर, नेस्को गोरेगाव, कांजूरमार्ग आणि मुलुंड जम्बो कोविड सेंटर बंद केले आहे. यातील बेडसह ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, विद्युत व्यवस्थेसह मोठय़ा सुविधाही पालिकेला मिळणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
पालिकेचे बारा हजार हजार बेड वाढणार
रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याने आगामी काळात सर्व जम्बो कोविड सेंटर बंद होऊन या ठिकाणचे सुमारे सात हजार बेड पालिका रुग्णालयांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या एकूण बारा हजार बेडची संख्या आणखी बारा हजारांनी वाढणार आहे.


























































