
अनंत सोनवणे,[email protected]
नैसर्गिक अरण्य… आपली जैव साखळीची निर्मितीच या अरण्यातून झालेली आहे. पण माणसांकडून या अरण्यांचे संवर्धन खरंच होते आहे का?
अरण्यवाचन’ या सदराचा हा शेवटचा लेख. या सदरात आजवर आपण महाराष्ट्रातली तसेच देशातली विविध अभयारण्यं, राष्ट्रीय उद्यानं आणि व्याघ्र प्रकल्पांची ओळख करून घेतली. या जंगलांचा इतिहास, भौगोलिक रचना, तिथली जैवविविधता, तिथं भेट देण्याच्या दृष्टीनं सर्वोत्कृष्ट हंगाम, वाहतूक व निवास व्यवस्था इत्यादी बाबींवर त्यानिमित्त प्रकाश टाकण्यात आला. तिथल्या प्राणी, पक्षी, वनस्पतींची वाचकांना भेट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूणच जंगलं आणि वन्य जीवांविषयी सकारात्मक विचारांची पेरणी व्हावी आणि त्यांचं जतन व्हावे हा या लेखनामागचा मूळ हेतू होता.
आजच्या घडीला महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्रच मोठय़ा प्रमाणावर जंगलतोड होताना दिसतेय. राखीव व संरक्षित जंगलांभोवतीच्या वाढत्या मनुष्यवस्तीचा प्रचंड मोठा ताण जंगलांवर पडतोय. माणूस जास्तीत जास्त जंगल जमीन मोकळी करून शेती किंवा उद्योगासाठी वापरण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आधीच मर्यादित असलेलं वनक्षेत्र अधिकाधिक घटत चाललंय. दुसरीकडे सरकारी पातळीवर जंगल, वन्य जीव, पर्यावरण या सगळ्या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष होतंय. आपल्या या कधीही न संपणाऱया हव्यासाची मोठी किंमत मुक्या वन्य जीवांना मोजावी लागतेय. जंगल कापत जाणारे महामार्ग किंवा रेल्वेमार्ग ओलांडताना रोज एक ना एक वन्य जीव बळी पडतोय. जंगलांना जोडणारे वनपट्टे (कॉरिडॉर) नाहीसे होत असल्यानं वन्य जीवांचं स्थलांतर कठीण होऊन बसलेय. माणूस-वन्य जीव संघर्षाच्या घटनांमध्येही वाढ होतेय. जंगलांचे आकार आणि भक्ष्य प्राण्यांची संख्या कमी होत चालल्यानं प्राणी मनुष्यवस्तीत येऊ लागलेत आपण जंगलांवर केलेलं अतिक्रमण सोयिस्कररीत्या विसरून माणूस उलट वन्य जीवच आपल्यावर अतिक्रमण करत असल्याचा कांगावा करतोय. त्यात खऱयाखोटय़ा घटनांची भर घालून वन्य जीवांना अधिकृतरीत्या ठार मारण्यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव आणतोय.

‘अवनी’सारखे मुके जीव याला बळी पडतायत.
कोणतंही जंगल ही एक स्वयंपूर्ण इको सिस्टीम असते. सूक्ष्म कीटकापासून हत्तीसारख्या महाकाय प्राण्यापर्यंत एक सुनियोजित अन्न साखळी इथं कार्यरत असते. या अन्न साखळीतल्या सर्व घटकांचा समतोल राखला जाईल याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते आणि या संपूर्ण व्यवस्थेत माणसाने लुडबूड करण्याची काहीही गरज नसते. त्याला तसा अधिकारही नसतो. मात्र दुर्दैवानं माणूस स्वतःला या साखळीच्या सर्वोच्च स्थानी मानतो आणि एकूणच या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट ही मानवाने तिचा उपभोग घ्यावा यासाठीच निर्माण झाली आहे अशा अविर्भावात वागतो. स्वतः विषयीचा आणि निसर्गाविषयीचा हा गैरसमज आणि त्यावर आधारित बेताल वर्तणूक यामुळे मानवजात स्वतःच स्वतःचा विनाश ओढवून घेत आहे.
प्युर्तो रिको इथल्या पर्जन्यवनांमध्ये अलीकडेच केलेल्या एका पाहणीत असं आढळून आलंय की, वातावरणातल्या बदलांमुळे तिथले 98 टक्के कीटक नाहीसे झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जगणारे बेडूक, पक्षी यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. 2015 साली झालेल्या एका संशोधनात असं सिद्ध झालं की, पृथ्वीवरच्या विविध सजीव प्रजाती नामशेष होण्याचा वेग गेल्या शतकभरात 114 पटींनी वाढलाय! तसेच अनेक प्रजाती या भूतलावरून कायमच्या नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत.
अशी आणखी खूप आकडेवारी देता येईल आणि ती प्रचंड अस्वस्थ करणारी आहे, पण आता केवळ अस्वस्थ होऊन आणि सरकारला दोष देऊन चालणार नाही. केवळ वाहनांमध्ये जंगल सफारी करून वन्य जीवांची आकर्षक छायाचित्रे काढून आणि ती समाज माध्यमांवर पोस्ट करून भागणार नाही. आपल्यापैकी प्रत्येक जंगलप्रेमी, वन्य जीवप्रेमी, निसर्गप्रेमी वाचकाने आता ठोस कृती करायची वेळ आली आह़े. कृती म्हणजे रस्त्यावर उतरून करायचं आंदोलन नव्हे. वेळ आली तर तेही करायलाच हवं, पण तूर्तास किमान सरकारच्या चुकीच्या निर्णयांना विरोध करायला आणि सरकारी यंत्रणांना जाब विचारायला सुरुवात करायला हवी. तसेच सर्वसामान्य नागरिक म्हणूनही आपल्या सभोवारच्या पर्यावरणाला हानी होणार नाही, प्रदूषण होणार नाही, जीवमात्राला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. या अत्यंत संवेदनशील विषयावर स्वतः सजग व्हावं, इतरांना जागरुक करावं आणि आपल्या नैसर्गिक ठेवा जतन करण्याला प्राधान्य द्यावं. आपल्यापैकी प्रत्येकानं किमान एवढं तरी करायलाच हवं. कारण ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्कानं मिळालेली नाही, तर आपल्या पुढच्या पिढय़ांची ठेव आहे!
























































