
सामना ऑनलाईन । कोलकाता
येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 45व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांना गोव्याने कडवी लढत दिली. अखेर 5-5 चढायांच्या जादा डावात महाराष्ट्राने गोव्यावर 48-43(9-4) अशी मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पहिल्या डावात 29-13 अशी आघाडी घेणाऱया महाराष्ट्राला दुसऱया डावात मात्र गोव्याने चांगलेच जेरीस आणले. पूर्ण डावात शेवटी 39-39 अशी बरोबरी झाली. सामन्याचा निकाल लावण्यासाठी 5-5 चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला. यात महाराष्ट्राने 9-4 अशी 5 गुणांनी बाजी मारली. असलम इनामदारचा अष्टपैलू खेळ आणि पंकज मोहिते, सौरभ पाटील यांच्या दमदार चढाया या विजयात महत्त्वाच्या ठरल्या. महाराष्ट्राची गाठ आता तेलंगणा संघाशी पडणार आहे.
एकीकडे मुले विजय मिळवीत असताना मुलींना मात्र छत्तीसगडकडून पराभव पत्करावा लागला. छत्तीसगडने महाराष्ट्रावर 36-24 अशा मोठय़ा फरकाने मात केली. मध्यांतराला 9-12 अशा 3 गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा सावरता आले नाही.




























































