
>> विजय जोशी, नांदेड
‘खड्ड्यांमुळे धक्क्यावर धक्के बसले. वाहनात मला टांगल्या सारखं झालं’, कैलासा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नांदेडच्या वाहतूकीसह खड्ड्याबाबत पद्मश्री कैलाश खेर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच वाभाडे काढले.
बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागतो. वाहतूक शिस्त नसल्याने वारंवार कोंडी होत याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता या गंभीर समस्येचा फटका आता सुप्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांना ही बसला. नांदेडमध्ये आयोजित कुसुम महोत्सवासाठी आलेल्या गायक कैलाश खेर यांना या समस्येचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच रस्त्यांच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत वाभाडे काढले. “रस्त्यावर माणसं चालत आहेत की जनावरे, हेच कळत नाही. खड्ड्यांमुळे धक्क्यावर धक्के बसले. वाहनात टांगल्या सारखं झालं,” अशा शब्दांत कैलाश खेर यांनी आपला अनुभव सांगितला.
माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चव्हाण कुटुंबियांच्या वतीने नांदेडमध्ये दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा ही संगीत शंकर दरबार आणि कुसुम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.२५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. रविवारी स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर तथा पद्मश्री कैलाश खेर यांचा कैलासा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम पार पडला. यावेळी कैलाश खेर यांनी गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजना वरून आमदार श्रीजया चव्हाण यांचे कौतुक देखील केले.
दरम्यान यावेळी त्यांनी नांदेडला येताचा अनुभव देखील सांगितला. हैद्राबादहून वाहणातून येतं असताना काही अंतरापर्यंत चांगलं वाटलं, पण त्यानंतर बेशिस्त वाहतुकीचा सामना करावा लागला. वाहनचालक ईकडून तिकडे वाहन चालत होते. रस्त्यावन माणसा ऐवजी जनावरांना मशीन दिल्यासारखं वाटतं होत, सारखं कार्यक्रम सुरु असल्याने झोप नव्हती, गाडीमध्ये झोपताला खड्यामुळे धक्यावर धक्के बसत होते. बेल्ट लावून बसल्यानंतर वाहनात टांगल्या सारखं वाटल अश्या शब्दात गायक कैलाश खेर यांनी नांदेडशहर आणि जिल्ह्यातील रस्ता आणि वाहतुकीवर नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह , पोलीस उपमानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापौर कविता मुळे यांच्या सह आजी माजी आमदार उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कैलाश खेर यांनी वाभाडे काढले.
दरम्यान या समस्ये बाबत काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापौर आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शंभर दिवसाच्या कामाच्या आरखडा बाबत माहिती घेत वाहतूकीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच हा वाहतूक कोंडीचा तोडगा निघणार असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.

























































