नासाच्या मंगळगृह यानावर कोरली जाणार कोंढुरच्या विद्यार्थ्यांची नावे

142

सामना प्रतिनिधी । कळमनुरी

अमेरिका स्थित जगप्रसिध्द ’नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने मंगळ गृहावर जुलै महिन्यामध्ये सोडण्यात येणाऱ्या यानावर कळमनुरी तालुक्यातील कोंढुर येथील सात शिक्षक व 166 विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. या माध्यमातुन अप्रत्यक्षरित्या कोंढुर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक थेट मंगळ ग्रहाला गवसणी घालणार आहेत.

अमेरिकेतील नासाचे मंगळरोहन 2003 अंतरिक्ष यान मंगळ ग्रहाच्या दिशेने जुलै 2019 मध्ये झेपावणार आहे. यासाठी नासाने त्यांच्या संकेतस्थळावर शाळेतील मुलांची नावे अपलोड करण्याचे आवाहन केले होते. जास्तीत जास्त मुलांपर्यंत याची माहिती पोहोचावी यासाठी नासाने ही शक्कल लढवली होती. यानंतर कोंढुर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांची नावे सकेतस्थळावर टाकली. आता मंगळ यानाच्या सेंसार चिपवर त्यांची नावे कोरली जाणार आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या बोर्डिंग पास नासाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढुरला पाठविल्या आहेत. यामुळे शाळेतील मुलांमध्ये एक जिज्ञासा निर्माण होणार असून अवकाश, सूर्यमाला यांचा अभ्यास करण्याची ही संधी मुलांना मिळणार आहे.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक बिमचा वापर करुन सिलिकॉनच्या चिपवर ही सर्व विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. मानवी केसाच्या एक हजाराव्या भागाइतक्या रुंदीत अर्थात 75 नॅनो मीटर स्टेन्सीलव्दारे ही नोंदणी होणार आहे. एक डेमी आकाराची चीप मंगळ यानावर मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर पाऊलखूणा सोडण्याची संधी नासाने उपलब्ध करुन दिली होती. या संधीचा कोंढुरच्या जिल्हा परिषद शाळेने लाभ घेतला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सुगंधे, शिक्षक शंकर लेकुळे, सुनील हरण, गिरीधर डोंगळे, सोनाली उमक, संजीवनी जांभुळकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची नासाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानुसार नासाच्या मंगळगृहावर सोडल्या जाणाऱ्या यानावर कोंढुरच्या विद्यार्थी व शिक्षकांची नावे कोरली जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या