बिल्डरचा हलगर्जीपणा, कल्याणमध्ये शॉक लागून मुलगा गंभीर जखमी

डोंबिवली कल्याण पश्चिममधील एका बहुमजली गृहनिर्माण संकुलात सोमवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली.
संकुलातील उद्यानात खेळत असताना 12 वर्षीय विहान देवळे या मुलाचा लोखंडी रेलिंगला धक्का लागताच त्याला शॉक लागून गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बिल्डरने विद्युत उपकरणांची कोणतीही देखभाल न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचा संताप व्यक्त होत आहे.

सोमवारी सायंकाळी संकुलातील इमारतीच्या उद्यानात विहान खेळत होता. खेळताना त्याचा स्पर्श एका लोखंडी रॉडला झाला आणि अचानक त्याला जोरदार शॉक बसून खाली पडला. या घटनेनंतर आजूबाजूचे रहिवासी तत्काळ धावून आले आणि विहानला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर संकुलातील रहिवासी संतप्त झाले असून त्यांनी संपूर्ण प्रकारामध्ये संबंधित बिल्डरचा निष्काळजीपणा आणि देखभालीतील दुर्लक्षाला जबाबदार धरले आहे.

रहिवाशांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित बिल्डरवर संताप व्यक्त करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. सद्यस्थितीत या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले.