कमला मिल परिसरातील गोवानी आणि गौरव इन्व्हेस्टमेंटच्या मालमत्ता केल्या जप्त, थकबाकीदारांना महापालिकेचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून कर निर्धारण विभाग-संकलन विभाग आणि जी/दक्षिण विभागाच्या माध्यमातून आज कमला मिल परिसरातील रमेश घमंडीराम गोवानी व मेसर्स गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्या मालकीच्या सात गाळ्यांसह कार्यालय, वाहनतळ, इंटरनेट सेंटर, टाटा पॉवर उपकेंद्रावर आज जप्तीची कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आर्थिक वर्ष 2025-26 चा आणि थकीत मालमत्ता कर 31 मार्चपूर्वी जमा केला नाही तर संबंधित मालमत्ताधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर बडय़ा थकबाकीदारांविरोधात आता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अशी होती थकबाकी

कमला मिल परिसरातील रमेश घमंडीराम गोवानी व मेसर्स गौरव इन्व्हेस्टमेंट यांच्याकडे मालमत्ता करापोटी 14 कोटी 22 लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच 67 लाख 25 हजार 731 रुपयांचीदेखील थकबाकी आहे. विहित मुदतीत मालमत्ता कर भरला नसल्याने टाटा पॉवर उपकेंद्र, इंटरनेट सेंटर, मोकळे वाहनतळासह सात गाळे आणि गोवानी यांच्या मालकीच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली.