कमलनाथ सरकारला दिलासा, बेपत्ता आमदार सुरेंद्रसिंह शेरा परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहे. काँग्रेसचे तीन व सरकारला समर्थन देणारा एक अपक्ष असे चार आमदार गायब झाल्याने सरकारची धास्ती वाढली होती. यापैकी सुरेंद्र शेरा हे अपक्ष आमदार परतल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मध्य प्रदेशमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असून कमलनाथ सरकारमधून नऊ आमदार बाहेर पडल्याचे सांगण्यात येत होते. त्यापैकी पाच आमदार बुधकारी रात्री भोपाळला परतले, मात्र काँग्रेसचे हरदीपसिंग डंग, बिसाहूलाल, रघुराज कंसाना आणि अपक्ष सुरेंद्रसिंह शेरा हे चार आमदार गायब होते. ते बंगळुरूला असल्याची चर्चा होती.

या चार आमदारांपैकी काँग्रेसचे हरदीपसिंग डंग यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, तर अपक्ष आमदार सुरेंद्रसिंह शेरा हे भोपाळला परतले आहेत. मुलीच्या उपचारासाठी बंगळुरूला गेलो होतो. मला कुणी डांबून ठेवले नव्हते असे शेरा यांनी स्पष्ट केले.

सत्तेची लालसा एवढीही ठेवू नये की लोकशाहीवरचा विश्वास उडेल!
मध्य प्रदेशातील राजकीय नाटय़ाबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जनतेला खुले पत्र लिहून भाजपकर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपच्या नेत्यांनी राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्याच्या विकासावरदेखील परिणाम झाला आहे. भाजपने सत्तेची लालसा एवढीही ठेवू नये की, जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल असे त्यांनी म्हटले आहे.

मंत्रीपद मिळण्याची आशा
भोपाळला येण्यासाठी शुक्रवारी विमानतळावर आलो असता दोन अज्ञात व्यक्तीनी आपल्याला रोखले आणि विमानात बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे आपले विमान चुकले. मी कमलनाथ सरकारसोबत आहे. ते नक्कीच आपल्याला मंत्रीपद देतील अशी आशा असल्याचे सुरेंद्रसिंह शेरा यांनी सांगितले.