
सामना ऑनलाईन । मुंबई
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगनाने तिचा सुपरहिट चित्रपट ‘क्विन’चा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हा आरोप केला. विकास बहल हा सध्या हृतिकसोबत काम करत असून हृतिक व कंगनाचे देखील गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत.

शनिवारी फँटम फिल्म्समध्ये काम केलेल्या एका महिला कर्मचारीने विकास बहल याच्यावर विनयभंगाचा आरोप केला. विकास बहल याने ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटाच्या वेळी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. त्या महिलेच्या आरोपांनंतर कंगना रानौतने तिला साथ देत विकास बहल याने ‘क्विन’ चित्रपटाच्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ‘बहल याचे लग्न झालेले असतानाही तो नेहमी वेगवेगळ्या पार्टनरसोबत सेक्स करायची चर्चा करायचा. आम्ही कधीही भेटलो की तो मला घट्ट मिठी मारायचा. माझ्या मानेजवळ त्याचा चेहरा न्यायचा व मला बोलायचा कंगना मला तुझ्या शरीराचा वास आवडतो. त्याचा हा प्रकार मला अजिबात आवडायचा नाही. मी त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करायचे. विकासवर आरोप करणाऱ्या त्या मुलीने याआधीही त्याच्यावर आरोप केले होते. तेव्हाही मी तिला पाठिंबा दिला होता. मात्र नंतर ते प्रकरण दाबलं गेलं’ असं कंगनाने या मुलाखतीत सांगितले.
हृतिक रोशनचा आगामी चित्रपट सुपर ३० या चित्रपटाचा विकास बहल हा दिग्दर्शक आहे. कंगनाचे हृतिकसोबत देखील वाद आहेत. कंगनाने हृतिकसोबत तिचे क्रिश च्या सेटवर अफेयर झाले होते असा दावा केला होता. हृतिकने मात्र ती खोटं बोलत असल्याचे सांगितलेले. त्यावरून या दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे.



























































