कंगनाविरुद्ध संताप, मुंबईकर एकवटले; मुंबई पुलीस के सम्मान में, मुंबईकर मैदान में!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरोधात महाराष्ट्रभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुठे पोस्टरला जोडे मारून तर कुठे तिचे पुतळे जाळून जनतेने आपला राग व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनीही फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून कंगना राणावतला फटकारले आहे. ज्या मुंबईने तुला नाव, पैसा, प्रसिद्धी दिली त्याच मुंबईविरोधात बोलतेस… लायकी आहे का गं तुझी, अशा शब्दांत नेटकरांनी कंगना राणावतविरोधात आपला संताप व्यक्त केला आणि ‘मुंबई पुलिस के सम्मान में, मुंबईकर मैदान में’ अशी ललकारी देत ठिकठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले.

कंगना राणावत विरोधात संताप व्यक्त करताना गिरगाव चौपाटी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाकलून लावा, हाकलून लावा… कंगनाला हाकलून लावा! अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. ठाणे जिल्हय़ातील महिलांनी कंगनाच्या पोस्टरला जोडे मारून ‘कंगना राणावत हाय हाय’ अशा घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये महिलांनी कंगना राणावतचा पुतळा जाळून तिच्या वक्तव्याचा निषेध केला. या आंदोलनांमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणींचाही समावेश होता.

अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर

शिवसेना आमदार व मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी तर कंगनाला तोंड बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. अनेक कलाकारांनी मुंबईत मेहनत करून स्वीत:ची किरकीर्द घडवली आहे. त्यांचे मुंबई व महाराष्ट्रावर प्रेम आहे. अशा मुंबईची तुलना कंगनाने पाकव्याप्त कश्मीरशी केली आहे. कंगनाचे हे वक्तव्य म्हणजे देशाशी गद्दारी करण्यासारखे आहे. कंगनाने तोंड बंद करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा प्रभू यांनी यावेळी दिला.

फेसबुक, ट्विटरवरही तीव्र पडसाद

फेसबुक, ट्विटरवरही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करणाऱया लाखो प्रतिक्रिया पडल्या आहेत. डॉ. राहुल घुले यांनी तर मोठ्या हृदयाच्या लोकांची ही मुंबई आहे. मुंबई हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर असल्याचे सांगत कंगनाला जर मानसोपचारतज्ञाची गरज असेल तर तेही पुरविले जातील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका व्यक्तीने मी खरा मुंबईकर आहे, मी कंगनाचे चित्रपट कधीच पाहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनघा पोळ यांनी तर ज्या मुंबईने पैसा, प्रसिद्धी दिली तिच्याविरोधात बोलायची लायकी तरी आहे का असा संतप्त सवाल केला आहे. तर एसआरके मनत याने ट्विट करीत नाटकी औरत म्हटले आहे तर अदिल मोगल याने ‘रास्ता देख और निकल ले’ अशा शब्दांत कंगनाचा समाचार घेतला आहे.