कंगनाविरोधातील चौकशी अहवाल मुंबई पोलिसांकडून सादर; 5 एप्रिलला मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटद्वारे दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेली अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. कंगनाविरुद्ध मुंबई पोलिसांनी आपला प्राथमिक चौकशी अहवाल मुंबईच्या वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आज सादर केला. यावर आज प्राथमिक सुनावणी घेण्यात आली असून पुढील सुनावणी 5 एप्रिलला होणार आहे.

कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एका विशिष्ट समाजाबद्दल द्वेषयुक्त व अपमानकारक ट्विट केले होते. आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनाने एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला होता. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. मात्र तिच्यावर कोणतीच फौजदारी कारवाई न केल्याने ऍड. अली काशिफ खान देशमुख यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेत पुढील कारवाईसाठी चौकशी होणे आवश्यक असल्याचे मॅजिस्ट्रेट कोर्टाने स्पष्ट केले होते. तसेच आरोपीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती हे कळणे गरजेचे असल्याने याबाबतचा चौकशी अहवाल दिलेल्या मुदतीत पोलिसांनी सादर करावा असा आदेशही न्यायाधीशांनी दिला होता. त्यानुसार कंगना व तिच्या बहिणीविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून चौकशी अहवाल आज कोर्टात सादर केला.