
मुंबईकरांसाठी राज्य सरकारमार्फत उभारण्यात येणारा मेट्रो प्रकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. कारशेड हे मेट्रो प्रकल्पाचे हृदय आणि आत्मा असून कांजुरमार्ग येथेच हे कारशेड होणे अत्यंत गरजेचे आहे. कारशेड नाही तर मेट्रोही चालणार नाही. त्यामुळे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसेल, असा ठाम युक्तिवाद एमएमआरडीएच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला.
आरे येथील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कांजुरमार्ग येथील जागेवर मिठागर आयुक्तांनी दावा केला आहे. याप्रकरणी आक्षेप घेत केंद्र सरकारने हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत कांजुरमार्ग येथील कारशेडच्या कामाला 16 डिसेंबर 2020 रोजी हायकोर्टाने स्थगिती दिली. या स्थगितीमुळे एमएमआरडीएचे आर्थिक नुकसान होत असून प्रकल्पही खोळंबत आहे. त्यामुळे स्थगिती उठवण्याची मागणी करत एमएमआरडीएने हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज आज सादर करण्यात आला. त्यावेळी एमएमआरडीएच्या वतीने ऍड. मिलिंद साठे व ऍड. साकेत मोने यांनी कांजुरमार्ग येथे कारशेड होणे अत्यंत गरजेचे असल्याचे कोर्टाला सांगितले. त्यांनी कोर्टाला सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे की, कारशेडशिवाय मेट्रो -3 (कुलाबा ते सीप्झ), मेट्रो-4 (कासारवडवली ते वडाळा) आणि मेट्रो-6 (लोखंडवाला ते विक्रोळी) धावू शकत नाही व एमएमआरडीएचे आर्थिक नुकसान होईल. एमएमआरडीएने माती परीक्षण, हस्तांतरण व इतर कामासाठी 27 कोटींची तरतूद यापूर्वीच केली असून कारशेडचा उपयोग मेट्रोच्या चार प्रकल्पांना होणार आहे.
पर्यावरणाचा ऱहास टळेल
102 हेक्टर जागा असलेल्या कांजुरमार्ग येथे कारशेड स्थलांतरित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आरेतील पर्यावरणाचा होणार ऱहास थांबवणे हा आहे. कांजुरमार्ग कारशेडमुळे वृक्षतोड टळेल. सध्या जागा कोणाच्या मालकीची आहे हा वाद सुरू असला तरी संबंधित जागेच्या मालकाला नुकसानभरपाई देण्यास एमएमआरडीए तयार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे नुकसान टाळण्यासाठी हायकोर्टाने कामावरील स्थगिती उठवावी. हायकोर्टाने हा अर्ज स्वीकारत यावर 12 मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे.
मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात, अहवाल तपासून कारशेडचा निर्णय
मुंबई मेट्रो प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा निश्चित करण्यासंबंधी राज्य सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला असून हा अहवाल तपासण्यात येत आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
आरे कॉलनीतील नियोजित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग येथे स्थलांतरित करण्यात आल्याबद्दल अतुल भातखळकर, देवेंद्र फडणवीस, ऍड. आशीष शेलार व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरात एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग-3 च्या संदर्भात 2015 मध्ये नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने कांजुरमार्ग येथील जागा तांत्रिकदृष्टय़ा व्यवहार्य असल्याची शिफारस केली होती. मात्र या जागेच्या मालकीहक्कासंदर्भातील न्यायप्रविष्ट दाव्यांच्या पार्श्वभूमीवर कांजुरमार्ग येथील जागा उपलब्ध न झाल्यास आरे कॉलनीचादेखील पर्याय सुचवला होता. मुंबई मेट्रो मार्गिका-3 व 6 एकत्र करून दोन्ही मार्गांसाठी कांजुरमार्ग येथे कारशेड उभारण्यास बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.


























































