कराड तालुक्यातील 750 युवक-युवतींना मिळाली नोकरीची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कराड

अतुल भोसले युवा प्रतिष्ठान आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय युवक-युवती रोजगार मेळाव्यात 2000 हून अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. यापैकी कराड तालुक्यातील 750 युवक-युवतींना नामांकीत कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध झाली आहे.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर नगरपरिषदेजवळील दत्तमंदिर परिसरात आयोजित रोजगार मेळाव्याला आज उदंड प्रतिसाद लाभला. कराडसह सातारा जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगार मेळावास्थळी गर्दी केली होती. या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भोसले म्हणाले, जिल्ह्यातील तरूणांना नोकरी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने राज्य सरकार याप्रकारचे मेळावे आयोजित करत आहे. त्याचप्रमाणे या मेळाव्याचाही उद्देश युवक-युवतींना नोकरीची संधी मिळावी, हा आहे. नोकरीसाठी व्यक्तिमत्व विकास व्हावा, तसेच मुलाखतीचे तंत्र अवगत व्हावे यासाठी येत्या काळात विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केले. अशोक थोरात म्हणाले, अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे आपल्या भागातील मुलांना नामंकीत कंपन्यांमध्ये रोजगार मिळणार असून, भविष्यात असे नाविण्यूपर्ण उपक्रम सातत्याने राबिवले जातील.

या मेळाव्यात भारत फोर्ज, युरेका फोर्बज्, बॉश, कुपर कार्पोरेशन, पी.एस.एम.एल. अशा एकूण 22 हून अधिक प्रख्यात कंपन्यांनी सहभाग घेतला होता. याठिकाणी मुलाखतीद्वारे 750 जणांची निवड करून त्यांना नेमणूक प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आल्याने, नोकरी मिळालेल्या युवक-युवतींच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.