
सामना प्रतिनिधी । कराड
गेले पाच ते सहा दिवस पाटण तालुक्यात सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी वसलेल्या पाटण शहरामध्ये महापुराचे पाणी घरांमध्ये घुसलेल्या बाधित कुटुंबियांना जिल्हयाचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांचेकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. पाटण शहरातील बाधित कुटुंबिंयाना 6 हजार ब्लँकेटचे वाटप आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आले. आमदार देसाई यांनी तांबवे ता. कराड, बनपेठवाडी, जोतीबाचीवाडी व मारुल तर्फ पाटण येथे ब्लॅकेटचे वाटप केले.
पाटण तालुक्यासाठी लवकरच आणखीन 4 हजार ब्लॅकेट पाठविणार असल्याचेही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. यामध्ये कराड तालुक्यासाठी 2 हजार ब्लॅकेट तर पाटण तालुक्यासाठी 4 हजार ब्लॅकेट पाठवून दिले आहेत. कराड येथे 2 हजार ब्लॅकेटचे वाटप विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड तालुक्यातील पोतले, येरवळे, चचेगाव, सैदापुर, रेठरे खुर्द, दुशेरे, कोडोली, कार्वे, रेठरे बुद्रुक, मालखेड, आटके या गावांमध्ये वाटप करण्यात आले आहे.
























































