‘मिम’वरून कर्जतच्या तासगावकर कॉलेजमध्ये राडा; तरुणाला बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण, 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा

इन्स्टाग्रामवर मिम टाकण्यावरून कर्जतच्या तासगावकर मेडिकल कॉलेजमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 12 विद्यार्थ्यांनी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला शिवीगाळ करत हातातील कडा, बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण केली आहे. यात तो जखमी झाला असून कर्जत पोलिसांनी राडेखोर 12 मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर महाविद्यालयाच्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

कर्जत तालुक्यातील चांदई येथील डॉक्टर एन. वाय. तासगावकर फिजिओथेरपी विभागात अन्हांत लेंडाने हा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तेथेच कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या बॉईज हॉस्टेलमध्ये तो राहतो. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी साडेसहा वाजता तासगावकर मीम इन्स्टाग्राम आयडीवर रोशन जावणे या विद्यार्थ्याचा मिम बनवून टाकण्यात आला होता.

मात्र हा मिम अन्हांतने बनवल्याचा संशय आल्याने रोशन, अन्हांत तसेच अन्य विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर काही क्षणात याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी हातातील कडा, बेसबॉल स्टिक, हाताबुक्क्यांनी आपल्याला मारहाण करून, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप अन्हांतने केला आहे. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी 12 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले असून अधिक तपास कर्जत विभागाचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करीत आहेत.