
कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या एका तरुणाने त्याची आई, बहिण व भाच्याची गळा चिरला.त्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात आई व बहिणीचा मृत्यू झाला असून आरोपी तरुण व त्याचा भाचा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कर्नाटकमधील बंगळुरू शहरात मोहन गौडा हा त्याची आई आशा (५५), बहिण वर्षिता (३४), भाचा मयंक (११) याच्यासोबत राहत होता. मोहन याच्यावर कर्जाचा बोझा होता. मोहन हा चिटफंडशी संबंधित व्यवहार करायचा. या व्यवसायात त्याला नुकसान झाले होते. तसंच त्याला ऐशोआरामात राहायची सवय होती. त्यामुळे त्याला पैसे अपुरे पडायचे. यामुळे त्याच्यावर कर्जाचा बोझा वाढत होता.
त्यामुळे वैतागलेल्या मोहनने आपली आई, बहीण आणि भाच्याचा गळा चिरला आणि त्यानंतर स्वतःचाही गळा चिरून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आपल्या नातेवाईकांना पाठवला. नातेवाईकांनी तत्काळ मोहनच्या घरी धाव घेतली. मात्र त्याआधीच त्याच्या आई व बहिणीचा मृत्यू झाला होता. तर मयंक आणि मोहन जखमी अवस्थेत दिसले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
























































