टीपू सुलतानाचं समर्थन करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, भाजप नेत्याच्या विधानाने वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी टीपू सुलतानाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. टीपू सुलतानच्या समर्थकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असं विधान करून भाजप नेत्याने वादाला तोंड फोडलं आहे.

कर्नाटमधील येलाबुरगा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजप नेते नलीनकुमार कतील यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही टीपू सुलतानचे वंशज नाही, तर आम्ही राम आणि बजरंगबलीचे भक्त आहोत. आम्ही टीपू सुलतानच्या वंशजांना राज्यातून बाहेर काढलं आहे. जे लोक टीपू सुलतानचे समर्थन करतात त्यांना जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. जे लोक भगवान राम आणि बजरंगबलीचे भक्त आहेत, तेच लोक कर्नाटकमध्ये राहतील, असं विधान त्यांनी यावेळी केलं.

काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसने टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता, याची काहीही आवश्यकता नव्हती, असं विधान केलं होतं. त्यावर राजकीय नेत्यांकडून स्वत:च्या सोयीनुसार टीपू सुलतानच्या नावाचा वापर होत असल्याचे म्हणत टीपू सुलतानाच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली होती.

राजकीय नेते त्यांच्या सोयीप्रमाणे टीपू सुलतान यांचे नाव वापरतात. असं करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. यापुढे टीपू सुलतान यांच्या नावाचा गैरवापर करण्याऱ्यांविरोधात आम्ही अब्रुनुकसानी दावा दाखल करू, अशी प्रतिक्रिया टीपू सुलतानाचे वंशज मन्सूर अली यांनी माध्यमांना दिली होती.