कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात केले दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला (Karnataka CM BS Yediyurappa tests positive for COVID19) असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते बरेही झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा ते या विषाणूच्या कचाट्यात सापडले आहेत.

येडियुरप्पा यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर करण्यात आलेल्या चाचणीमध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र आज करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना पहिल्यांदा रमैया मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आता त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सकाळी घेतली आढावा बैठक

शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सकाळी आपल्या निवासस्थानी राज्यातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये जारी असणारा नाईट कर्फ्यू 20 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच 18 एप्रिलला कोरोना स्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक घेण्यात येईल असे म्हणत लॉकडाऊनची शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती.

कर्नाटकातही कोरोनाचा उद्रेक

देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे यात कर्नाटकचाही समावेश आहे. कर्नाटकमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 11 हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळले. यासह राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाखांच्या पार गेला आहे. यातील 9 लाख 99 हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर 96,580 सक्रिय रुग्ण आहेत.