कर्नाटकमध्ये आमचे सरकार पुन्हा अस्थिर करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या विधानाने चर्चेला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकमध्ये जनतेने भाजपच्या कमीशन सरकारला चांगलीच धोबीपछाड देत काँग्रेसचे सरकार बहुमताने विजयी केले. कर्नाटकमधील हा पराभव भाजपचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच याबाबत वक्तव्य केल्याने खळबळ उडाली असून पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

याआधीच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केले होते. मात्र, अल्पावधीतच हे सरकार पाडून भाजप सत्तेत आले. मात्र, या विधानसभा निवडणुकीत जनतेने स्पष्टपणे काँग्रेसला कौल दिला आणि काँग्रेसचे बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. कर्नाटकातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने पुन्हा एकदा भाजपकडून कर्नाटकमधील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे स्वतः मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी म्हटले आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकारण आणि ऑपरेशन लोटसच्या चर्चांना उधाण आले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या म्हणाले की, भाजपचे लोकं आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश मिळणार नाही. भाजपने याआधी आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात त्यांना यश मिळाले होते. मात्र आता, त्यांना पुन्हा यश मिळणार नाही, असा विश्वास सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

हे तर स्पष्ट आहे की, भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते. मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी आमचा एकही आमदार त्यांच्याबरोबर जाणार नाही, असेही सिद्धारमय्या यांनी स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आयुष्यभर निधर्मवादाची कास धरणारे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्नाटक जनता दलातील अनेक नेत्यांना भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय पटलेला नाही. यामुळे हे नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. देवेगौडा यांचा निर्णय मान्य नसलेली मंडळी पक्षातून बाहेर पडतील किंवा त्यांना पक्षातून बाहेर काढले जाईल. यातून धर्मनिरपेक्ष जनता दलात फूट पडणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा ‘कर नाटक’ वरून राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे.