पोलीस ठाण्यात दलिताला बेदम मारहाण, मूत्र देखील प्यायला लावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकात एक अमानुष प्रकार समोर आला आहे. एका दलिताला पोलीस स्थानकात हातपाय बांधून बेदम मारुन त्याचे मूत्र प्यायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी तरुणाने पोलीस उपनिरीक्षकाविरोधात पोलीस महासंचालक आणि मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून कडक कारवाईची मागणी केली आहे.

कर्नाटकातील चिकमंगलून येथे ही घटना घडली आहे. हा तरुण एका महिलेसोबत बोलत असल्याचे गावातील काही लोकांना खटकत होते. त्यांनी त्याबाबत पोलिसांना तोंडी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्याच्यावर खोटे आरोप करत तरुणाला अटक केली. त्यानंतर 10 मे रोजी या दलित तरुणाला चीकमंगलूरच्या गोनीबिडू पोलीस स्थानकात त्याचे हातपाय बांधून पोलिसांनी बेदम मारले. त्यानंतर अर्धमेल्या झालेल्या त्या तरुणाने तहान लागलीय म्हणून पाणी मागितले. मात्र पोलीस उपनिरीक्षकाने एका दुसऱ्या पोलिसाला बोलावून त्याच्यावर लघवी करायला सांगितली. त्यानंतर सुटका करायची असल्यास खाली सांडलेले मूत्र प्यायला भाग पाडले. त्यानंतर त्याला सोडले.

याप्रकरणी दलित तरुणाने पीडित तरुणाने डीजीपी प्रविण सूद आणि मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून या घटनेबाबत न्याय मागितला आहे. तसेच त्या पोलीस उपनिरीक्षकाची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली असून कर्नाटक पोलिसांनी शनिवारी याप्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे.