सीमाभागात कानडी हैदोस, बेळगावातील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर भ्याड हल्ला

कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी आज बेळगावातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर अक्षरशः हैदोस घातला. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले करीत तुफानी दगडफेक आणि तोडपह्ड केली. महाराष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या. कन्नडिगांच्या गुंडगिरीमुळे सीमाभागात तणाव वाढला आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील मिंधे सरकार कधी जागे होणार? कर्नाटकातील भाजप सरकारला चोख प्रत्युत्तर देणार का? असे प्रश्न सीमाभागातील मराठी बांधव आणि महाराष्ट्रातील जनता विचारत आहे.

कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सततच्या बेताल वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात तणाव वाढला आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात पाऊल ठेवू नये, असा दम मुख्यमंत्री बोम्मई यांनी भरला. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांनी आज होणारा बेळगाव दौरा रद्द केला. महाराष्ट्रातील मिंधे सरकार कोणतेही प्रत्युत्तर देत नाही. त्यामुळे कन्नडीगांची मस्ती वाढल्याचे आज दिसले.

झेंडे फडकवत धुडगूस घातला

बेळगावामधील राणी चन्नम्मा सर्कल येथे पुष्पहार अर्पण करून लाल-पिवळा कन्नड झेंडे फडकवत शेकडो कार्यकर्ते टोलनाक्यावर आले. महाराष्ट्र पासिंगची नंबरप्लेट असलेल्या गाडय़ा अडविल्या आणि हल्ला चढविला. दगडफेक करीत मोडतोड केली. गाडय़ांच्या काचा पह्डल्या, नंबरप्लेट तोडल्या. गाडय़ांना काळा रंग फासला. किमान सहा ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

करवेच्या गुंड कार्यकर्त्यांचा तासभर हैदोस सुरू होता. पोलिसांचे संख्याबळ कमी आणि कार्यकर्ते जास्त अशी स्थिती होती. बेळगावचे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील घटनास्थळी आले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बोम्मई पुन्हा बरळलेमहाराष्ट्रामुळे सीमाभागात तणाव; कायदेशीर लढाई आम्हीच जिंकू

महाराष्ट्र सरकारच सीमावादाचा प्रश्न अधिक भडकवत आहे. महाराष्ट्रामुळेच सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केला. निवडणुका आणि सीमावादाचा काहीही संबंध नाही. हा महाराष्ट्राने बराच काळ ओढलेला मुद्दा आहे. सीमावादाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असून संविधानानुसार ही कायदेशीर लढाई आम्हीच जिंकू, असेही ते म्हणाले.

स्वत:साठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत, मिंधे सरकारला आदित्य ठाकरेंचा टोला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगित करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुŠखाची गोष्ट आहे. महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतŠसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत, असा  टोला  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला लगावला.

एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र या सगळ्यावर गप्प का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

राग या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मिंधे सरकारच्या नाकर्तेपणाचा समाचार घेतला.

महाराष्ट्राचा अभिमान आहे की सर्व खोक्यात वाहून गेलं? शिवसेना नेते संजय राऊत यांचा सवाल

या विषयावर महाराष्ट्र जर पेटला तर या सरकारला भारी पडेल. कर्नाटकाचं नंतर पाहू. डोळे मिटून बसलायत, स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे का? की सर्व खोक्यात वाहून गेलं, असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

सरकार काय करतंय? मुख्यमंत्री कुठे आहेत? आम्ही त्या काळात बेळगावात जाऊन लाठय़ाकाठय़ा खाल्ल्यात असं ते सांगतात. कधी खाल्ल्यात? सीमाप्रश्नासाठी लाठीकाठी खाल्ली असती तर आज ज्या खुर्चीवर तुम्ही बसले आहात त्या खुर्चीवरून महाराष्ट्राचा कर्नाटकने केलेला अपमान तुम्ही पाहिला नसता. आमच्या सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कर्नाटकात केलं जातंय. तुम्ही कुठे भूमिगत झालात?,  या सरकारला पाय नसून खोके आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका!

कर्नाटकची दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत. महाराष्ट्राच्या संयमाचा अंत पाहू नका, महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने पहाल तर याद राखा. जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कन्नडींगाना ठणकावले आहे. कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील गावे घेण्याची घोषणा करते आणि महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता ठोस भूमिका घेतली पाहिजे. केंद्राने हस्तक्षेप करून कर्नाटकला समज द्यावी, असे भुजबळ म्हणाले.

एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक

महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांची अडवणूक करू नका या मागणीचे निवेदन देण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळालाच पोलिसांनी अटक केली. यामुळे पुन्हा एकदा सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हे शिष्टमंडळ दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते.

महाराष्ट्रातील खोके सरकार काय करतेय?

फडणवीस सकाळी बोम्मईंशी बोलले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी बोम्मईंना पह्न करून निषेध व्यक्त केला. तर नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदेंनीही संध्याकाळी बोम्मईंना फोन केला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्र्यांची तातडीची बैठक घेतली आणि तेथूनच बोम्मईंना पह्न लावला. दोन्ही मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट होईल.

मंत्री शंभुराज देसाई यांनी बेळगाव दौरा रद्द केला मात्र मी नंतर जाणार आहे, असा पवित्रा त्यांनी घेतला.

बेळगाव

पुणेबंगळुरू महामार्गावर बेळगाव जिह्यातील हिरेबागवाडी हा प्रमुख टोलनाका आहे. या टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या  नारायण गौडा गटाच्या गुंड कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.