
कर्नाटकचे मंत्री डी. सुधाकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फुफ्फुसात झालेल्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बंगळुरू येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत डी. सुधाकर यांना श्रद्धांजली वाहिली.
डी. सुधाकर हे कर्नाटकचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री होते. सुरुवातीला त्यांना गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी बंगळुरूच्या मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाला. त्यानंतर त्यांना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात येथे आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना ECMO/ECLS सह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. फुफ्फुस प्रत्यारोपणाची तयारी सुरू असतानाच रविवारी पहाटे 3.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे मंत्री डी. सुधाकर यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले आहे. काँग्रेस विचारधारेचे वाहक असलेल्या सुधाकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य चित्रदुर्ग आणि कर्नाटकच्या गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
Deeply saddened by the passing of senior Congress leader and Karnataka Minister, D. Sudhakar ji.
A torchbearer of Congress ideology, his life was spent in service of the poor of Chitradurga and Karnataka.
My condolences to his family and supporters. pic.twitter.com/3cuBwm9O5f
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 10, 2026
कोण होते डी. सुधाकर?
सुधाकर हे मूळचे चल्लकेरे येथील असून जैन समाजातील होते. 28 मार्च 1961 रोजी जन्मलेले सुधाकर हे उद्योगपती दशरथय्या आणि कांचनमाला यांचे तिसरे पुत्र होते. बी. कॉम पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते हिरियुरचे विद्यमान काँग्रेस आमदार आणि चित्रदुर्ग डीसीसी बँकेचे अध्यक्ष होते. 2004 ला ते चल्लकेरे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2008 मध्ये चल्लकेरे मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी हिरियुरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 2008 मध्ये त्यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. या काळात त्यांनी बी. एस. येडियुरप्पा सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री म्हणून काम पाहिले. मात्र एका वर्षानंतर ‘भिकारी कॉलनी’घोटाळा उघडकीस आल्यावर त्यांच्याकडून समाजकल्याण खाते काढून घेण्यात आले आणि त्यांना मुझराई विभागाचे मंत्री करण्यात आले. त्यानंतर 2013 मध्ये ते पुन्हा काँग्रेसकडून आमदार झाले. 2018मध्ये त्यांना पूर्णिमा श्रीनिवास यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला, पण 2023 मध्ये त्यांनी पुन्हा श्रीनिवास यांचा पराभव करून ही जागा जिंकली.



























































